
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (हवेली) : समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील शिपाई पदावर कार्यरत असलेले सोमनाथ यशवंत रावडे यांनी ‘लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स’ या विषयातून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘सेट’ परीक्षेत यश मिळवले आहे. ही परीक्षा १५ जून २०२५ रोजी झाली होती व ३० ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला.
रावडे यांनी नोकरीला लागल्यावेळी फक्त इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. नोकरी व कुटुंब सांभाळताना एका पायाने अपंग असूनही त्यांनी प्रचंड जिद्द व परिश्रमाच्या जोरावर बी.लिब. आणि एम.लिब. पदव्या मिळवल्या. ‘सेट’ परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांनी सलग तीन वेळा प्रयत्न केला होता; मात्र चौथ्याच प्रयत्नात त्यांनी ध्येय गाठले.
४ सप्टेंबर २०२५ रोजी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात त्यांचा प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य सतीश कुदळे, डॉ. स्नेहा बुरगुल आदी उपस्थित होते.
सोमनाथ रावडे यांच्या या यशामुळे महाविद्यालयात तसेच लोणी काळभोर परिसरात सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Editer sunil thorat



