आमदार सुनील शेळके यांचा उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांच्यावर घणाघात; भ्रष्टाचारविरोधी चौकशी अहवालाकडे नागरिकांचे लक्ष…
मावळ भूमी अभिलेख कार्यालयाचे ‘रेटकार्ड’ उघड!

मावळ (पुणे) : (दि.11) मावळ तालुक्यातील भूमी अभिलेख विभागातील प्रचंड भ्रष्टाचार, लाचखोरी आणि मनमानी यावर आमदार सुनील शेळके यांनी थेट हल्ला चढवला आहे. विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जमीन मोजणीच्या कामासाठी स्वतःचे ‘रेटकार्ड’ तयार करून नागरिकांकडून उघडपणे पैशांची उकळी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या “रेटकार्ड”च्या उघडकीनंतर मावळ तालुका, तसेच महसूल खात्यात खळबळ उडाली असून, चौकशी समितीचा अहवाल आणि पुढील शासकीय कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“गुंठ्यापासून एकरापर्यंत दर ठरवले!” ; आमदार शेळके यांचा आरोप
आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मावळ भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी खुलेआम दर ठरवले आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार —
—ग्रामीण भागात मोजणीसाठी ₹१०,००० प्रति एकर,
—औद्योगिक (MIDC) क्षेत्रात ₹१,००,००० प्रति एकर,
—तळेगाव, लोणावळा व वडगाव परिसरातील प्लॉट मोजणीसाठी ₹१०,००० ते ₹२०,००० प्रति गुंठा इतके पैसे मागितले जातात.
शासकीय फीव्यतिरिक्त हे ‘अतिरिक्त पैसे’ शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाल्याचा दावा शेळके यांनी केला. “ही भ्रष्टाचाराची लूट थांबवलीच पाहिजे,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.
“रेटकार्ड” उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ…
या धक्कादायक उघडकीनंतर महसूल विभागातच नव्हे, तर संपूर्ण राज्य प्रशासनातही एकच खळबळ उडाली आहे. मावळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप होत आहे. शासकीय कामात विलंब करून, दस्तऐवजांसाठी अडथळे निर्माण करून आणि “सुविधा शुल्क” मागून नागरिकांना अडकवले जात असल्याचेही तक्रारींत नमूद करण्यात आले आहे.
उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांच्यावर गंभीर आरोप…
या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांचे नाव आल्याने प्रकरण आणखी गडद झाले आहे.
आमदार सुनील शेळके यांनी पल्लवी पिंगळे यांच्या कारभारावर थेट निशाणा साधत म्हटले की…
—शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावून, जाणूनबुजून विलंबाने ‘क’ प्रत देणे,
—आर्थिक व्यवहार झाल्यासच फाईल्स पुढे सरकवणे,
—पैसे न दिल्यास अपील केसेसमध्ये जाणूनबुजून विरोधात निकाल देणे,
—संपादित जमिनींच्या मोजणीसाठी आर्थिक मागणी करणे,
—गुंतवणूकदारांना विशेष सवलती देऊन त्यांच्यासाठी जागेचा ताबा निश्चित करणे,
—चुकीचे प्रॉपर्टी कार्ड तयार करणे,
अशा अनेक गंभीर अनियमितता त्यांच्या कारकिर्दीत झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“सतीश, कोमल आणि परेश”, मावळ कार्यालयातील ‘कलेक्शन त्रिकूट’!
या गैरव्यवहारात काही खासगी व्यक्तींचीही थेट भूमिका असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी उघड केले.
त्यांच्या मते, “सतीश, कोमल, आणि परेश” हे तिघे मिळून भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व आर्थिक व्यवहार हाताळतात.
या त्रिकुटामार्फत लाखो-कोट्यवधी रुपयांची उकळी केली जात असल्याची चर्चा खुलेआम सुरू आहे. या तिघांचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
__नागरिकांना आवाहन — “आठवडाभरात तक्रारी दाखल करा”
आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “शासकीय कामासाठी कोणीही पैशांची मागणी केली असल्यास त्याचा पुरावा घेऊन तक्रार दाखल करा. सर्व तक्रारींची चौकशी महसूलमंत्री यांच्या नियंत्रणाखालील विशेष समितीकडून केली जाईल.”
आमदार सुनील शेळके म्हणाले,
> “शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून वसुली करणाऱ्यांना मी सोडणार नाही.
हे कार्यालय लोकांच्या सोयीसाठी आहे, त्रास देण्यासाठी नाही. भ्रष्टाचाराला मी ठाम विरोध करणार आहे.”
महसूलमंत्र्यांकडे तक्रार पोहोचली ; तपास सुरू…
या प्रकरणाची प्राथमिक माहिती महसूलमंत्री व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचली असून, चौकशी समितीने संबंधित दस्तऐवज मागवले आहेत. मावळ विभागातील दोन वर्षांच्या नोंदींची तपासणी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांमध्ये संताप, “आम्हाला न्याय हवा”
या प्रकरणानंतर मावळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की…
> “आमच्याकडून ‘क’ प्रत मिळवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी हजारो रुपये घेतले.
पैसे दिल्याशिवाय कोणीही फाईल पुढे नेत नाही. आता आमदार शेळके यांनी आवाज उठवला म्हणून आशा निर्माण झाली आहे.”
राजकीय व प्रशासकीय पातळीवर हलचल…
या प्रकरणामुळे मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्येही खळबळ उडाली आहे. आमदार सुनील शेळके यांनी उघड केलेल्या या भ्रष्टाचारप्रकरणामुळे भूमी अभिलेख विभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लवकरच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी दिशा…
चौकशी समितीने सर्व नोंदी तपासून पुढील आठवड्यात प्राथमिक अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या अहवालानंतर उपअधीक्षक पल्लवी पिंगळे आणि संबंधित त्रिकुटावर निलंबन किंवा विभागीय कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
Editer Sunil thorat



