१ आणि २ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे होणार राज्य व अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन, महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी..
महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी...

अमरावती : राज्यातील पक्षीप्रेमींसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे ३८वे महाराष्ट्र राज्य तसेच तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन यावर्षी दि. १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार, निवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि ख्यातनाम वन्यजीव संवर्धक प्रवीणसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
चार दशकांची पक्षीप्रेमींची चळवळ…
‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ ही संस्था राज्यभर गेली चार दशके पक्षी अभ्यास, संवर्धन आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत राज्याच्या सर्व विभागांत कार्यरत असलेले शेकडो पक्षीप्रेमी, संशोधक आणि विद्यार्थी एकत्र येऊन पक्षी संवर्धनासाठी जनचळवळ उभी करत आहेत. राज्यात आजवर ३७ राज्यस्तरीय आणि ३० विभागीय पक्षीमित्र संमेलने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे, जिथे पक्षी संवर्धनासाठी संघटित पद्धतीने कार्य करणारे ‘पक्षीमित्र नेटवर्क’ अस्तित्वात आहे.
अमरावतीत दोन दिवसीय संमेलन…
यंदाचे संमेलन अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात दोन दिवस होणार असून, या संमेलनासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून सुमारे ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी, निबंध, चित्रकला आणि क्विझ स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनादरम्यान पक्षी संवर्धनातील तज्ज्ञांची व्याख्याने, नवनवीन संशोधन सादरीकरणे, तसेच पक्षी अभ्यासकांचा अनुभव आदानप्रदान होणार आहे.
वन्यजीव संवर्धनातील प्रवीणसिंह परदेशी यांचे योगदान…
प्रवीणसिंह परदेशी हे वन्यजीव आणि पक्षी छायाचित्रकार तसेच संवर्धन क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभर ओळखले जातात. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’तील पुनर्वसन योजना आणि वनविभागाचे सचिव म्हणून केलेले नवे प्रयोग यांमुळे त्यांनी वन्यजीव संवर्धनात ठसा उमटविला.
सध्या परदेशी हे राज्य नियोजन संस्थेच्या ‘मित्रा’ या प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत. तसेच देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह वन्यजीव संस्था असलेल्या ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)’ चे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ संस्थेशी ते गेली तीन दशके जोडलेले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक नवकल्पना राबवल्या आहेत.
पक्षी संवर्धनासाठी नवा दृष्टिकोन…
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रवीणसिंह परदेशी यांच्या निवडीमुळे या वर्षीच्या पक्षीमित्र संमेलनाला एक वेगळी झळाळी लाभणार आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि प्रशासनातील दृष्टीकोनाचा फायदा पक्षी संवर्धनाच्या धोरणात्मक नियोजनाला होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
संमेलनात पक्षी निरीक्षण, जैवविविधता, हवामान बदल, आणि नागरीकरणाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम यावरही विशेष सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
अमरावती येथे होणारे हे संमेलन पक्षीप्रेमी, संशोधक, आणि विद्यार्थी यांच्यासाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरणार आहे. राज्यातील पक्षीप्रेमींच्या या सर्वात मोठ्या मेळाव्यातून पक्षी संवर्धनासाठी नवे उपक्रम आणि दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार, निवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना ख्यातनाम वन्यजीव संवर्धक या पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार अमोल रजपूत यांनी या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
Editer Sunil thorat





