यवत पोलिसांची कारवाई २७ लाखांचा गुटखा साठा जप्त! पण गाडी गायब — “आका” कोण? चोर सोडून सन्यासाला अटक का?

यवत (पुणे) : पुणे ग्रामीण पोलीस दलाने यवत परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ₹२७,९७,६२४/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे. मात्र, या प्रकरणात एक संशयास्पद गाडी महिलेसोबत बाचाबाची करून घटनास्थळावरून पळवून नेण्यात आली असून, ती गाडी आणि संबंधित आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.
गाडीचा नंबर पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात असले तरी वाहन आणि त्यामागचा “खरा सूत्रधार” अजूनही पकडता आलेला नाही. यामुळे आता स्थानिकांतून मोठा सवाल विचारला जातोय.
“चोर सोडून सन्यासाला अटक का?”
म्हणजे मोठे आके मोकळे, आणि लहान माणूसच कारवाईत सापडतो का?
कारवाईचा तपशील…
पोलीस उपनिरीक्षक विजय बबन कोल्हे (यवत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ रतन झुरंगे (रा. बोरीऐंदी, झुरंगेवस्ती, ता. दौंड) याने आपल्या घराजवळील पत्र्याच्या खोलीत विविध कंपनींचा गुटखा आणि पानमसाला साठवून ठेवला होता.
आरएमडी पान मसाला, डायरेक्टर पान मसाला, शॉट ९९९, विमल पान मसाला अशा ब्रँड्सचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या मालाची एकूण किंमत जवळपास ₹२७.९७ लाखांपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी जारी केलेल्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करून हा साठा ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हा नोंद – पण मुख्य आरोपी अद्याप मोकाट ?
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १२३, २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यांनी गुटखा पुरवठा केला, साठा मागवला, आणि वितरण जाळे चालवले – त्या “आक्यांचा” शोध मात्र अद्याप लागलेला नाही.
गाडीचे गौडबंगाल – पोलिस गप्प!
कारवाईदरम्यान एका वाहनात महिलेसोबत बाचाबाची करून ती गाडी पळवून नेण्यात आली होती. गाडीचा नंबर मिळाला असला तरी ती गाडी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यामुळे जनतेतून प्रश्न उपस्थित होतोय —
“गाडी कुठे गायब झाली? कोणाला वाचवण्यासाठी हे मौन?”
जनतेचा संताप – ‘आका’ कधी जाळ्यात?
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला आहे की,
“अवैध गुटखा पानटपऱ्यांवर सर्रास विकला जातो. तर मग दररोज विक्री करणारे आणि साठा पुरवणारे मोठे ‘आका’ अजून मोकळे का फिरत आहेत?”
यावरून नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढत असून,
> “तेरी भी चूप… मेरी भी चूप!”
अशी टीका सर्वत्र होत आहे.
तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात…
या अवैध गुटखा व्यापारामुळे तरुण पिढी हळूहळू व्यसनाधीनतेकडे झुकत आहे. मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून, जनआरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat



