सेंट तेरेसा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रभावी पथनाट्य सादरीकरण, एमआयटी एडीटी विद्यापीठात मानसिक आरोग्य दिन साजरा…

कदमवाकवस्ती : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च तर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सेंट तेरेसा स्कूल, लोणी काळभोर येथे “मानसिक आरोग्याची संवेदनशीलता” या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्यातून शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणारा मानसिक ताण, पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचा अतिरिक्त दबाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्या यांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी पालक व शिक्षक यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबतही प्रभावी संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मानसिक संतुलन राखण्यासाठी मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, ध्यान-प्राणायाम, व्यायाम आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचा अवलंब करण्याचे महत्त्वही सादरीकरणातून अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षक, विशेषतः शालेय चिमुकले, मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेंट तेरेसा स्कूलचे मुख्याध्यापक विनय सुकुल आणि उपमुख्याध्यापिका सॅलविना सुकुल यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेचा शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राध्यापक आणि छात्र-अध्यापकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड आणि कुलगुरू डॉ. राजेश एस. यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. तर कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि अधिष्ठाता डॉ. प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. नीता म्हवाण यांनी केले.
Editer sunil thorat



