कळस येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…

डॉ गजानन टिंगरे
कळस (ता. इंदापूर) : रविवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कळस येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ वैशालीताई प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या, पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यांनी उपस्थित बालकांना पोलिओची लस पाजून मोहिमेचा प्रारंभ केला.
या वेळी आरोग्य विभागातर्फे मोहिमेचे नियोजन, तयारी व जनजागृती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. जोरी यांनी सांगितले की, “प्राथमिक आरोग्य केंद्र कळस अंतर्गत एकूण १३ लसीकरण बूथवर आज दिवसभर लसीकरण सुरू आहे. तसेच पुढील तीन दिवस घरभेटीच्या माध्यमातून १४ पथकांमार्फत राहिलेल्या बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक पालकाने आपले मूल वगळू नये आणि लसीकरणास नक्की सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जोरी यांनी पुढे सांगितले की, पोलिओ निर्मूलनासाठी ही राष्ट्रीय पातळीवरील मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक बालकाला पोलिओ लस देऊन देश पोलिओमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. धनश्री माळी, दत्तात्रय ओमासे, पांडुरंग गायकवाड, शरद ससाने (आरोग्य निरीक्षक), श्रीमती सुवर्णा शिंदे, भंडलकर (आरोग्य सहाय्यिका), अनंत गायकवाड, सुरज सय्यद (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), तसेच श्रीमती सुनीता शिंदे (आशा कार्यकर्ती) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरोग्य सहाय्यिका सुवर्णा शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद ससाने यांनी मानले.
या मोहिमेला ग्रामस्थ, पालक व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृतीचा संदेश या मोहिमेमुळे अधिक दृढ झाला आहे.
Editer Sunil thorat





