अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई : तब्बल दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त…

पुणे : (दि. १६ ऑक्टोबर) सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली असून तब्बल ₹१ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षिततेचा” या विशेष अभियानांतर्गत करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य आणि जनहित लक्षात घेऊन पुणे विभागाकडून ही मोहीम राबविण्यात आली होती.
सणासुदीच्या काळात चालविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत. कारवाईदरम्यान खवा, स्वीट मावा, तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती, भगर यांसारख्या अन्न पदार्थांचे ६५४ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
त्यापैकी आतापर्यंत आलेल्या २१६ नमुन्यांपैकी १९० दर्जेदार, ५ कमी दर्जाचे, ८ मिथ्याछाप तर १३ नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोषी आस्थापनांवर कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास किंवा संशय असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २२ २३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.
Editer sunil thorat




