जिल्हासामाजिक

दिवाळीआधीच काळाचा घाला! गोडाऊनला भीषण आग; सुमारे २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक…

तुळशीराम घुसाळकर 

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जेके सेल्स या नामांकित इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री केंद्राच्या गोडाऊनला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. वायर शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत सुमारे २ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. ऐन दिवाळीत या घटनेमुळे व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

सदर गोडाऊन मधुबन मंगल कार्यालयाच्या मागे, शिवम हॉस्पिटल परिसरात असून, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान अक्षय काळभोर आणि फिरोज खान मेटकरी यांच्या भागीदारीत चालते. या दुकानात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, एसी, पिठाची गिरणी, गिझर, फिल्टरसह विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते.

दिवाळी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यात आला होता. त्यामध्ये ३५९ फ्रिज, ५० टीव्ही, ९० वॉशिंग मशीन, ७० एसी, ४० कुलर, १२ पिठाच्या गिरण्या, ५ फॅन, ४९ गिझर आणि २५ फिल्टर असा सुमारे दोन कोटी रुपयांचा माल होता.

घटनेचा थरार…

रविवारी (१९ ऑक्टोबर) रात्री सव्वा दहाच्या सुमारास परिसरातील नागरिकांना गोडाऊनच्या बाहेर वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे दिसले. क्षणार्धात वायर जळत गोडाऊनच्या दिशेने आग पसरली. तातडीने जेके सेल्सचे संचालक अक्षय काळभोरफिरोज मेटकरी यांना माहिती देण्यात आली. दोघे घटनास्थळी पोहोचले तेव्हा गोडाऊनच्या शटरमधून धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या.

स्थानिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणांतच आगीने भीषण रौद्र रूप धारण केले. संचालक आणि कामगारांनी चारही शटर तोडून वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बहुतांश वस्तूंना आगीने ग्रासले होते. यादरम्यान एका फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न…

या घटनेची माहिती हडपसर अग्निशमन दलाला देण्यात आली. अर्ध्या तासातच दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र तीव्रतेमुळे दुसरी गाडीही बोलावण्यात आली. दोन्ही गाड्यांच्या मदतीने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णतः आटोक्यात आणण्यात यश आले.

परंतु तोपर्यंत गोडाऊनमधील सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या होत्या. प्राथमिक पंचनामा अहवालानुसार सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

आधी अतिवृष्टी, आता आग, व्यापाऱ्यांची निराशा…

विशेष म्हणजे, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जेके फर्निचर, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन आणि आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी या तिन्ही व्यावसायिक ठिकाणी पाणी शिरून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यातच आता या आगीच्या घटनेमुळे एकूण पाच कोटी रुपयांचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त व्यावसायिकांची मागणी…

“ऐन दिवाळीत ही आग आमच्यासाठी विनाशकारी ठरली आहे. आम्ही पूर्णपणे आर्थिक गर्तेत सापडलो आहोत. विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच बँकांनी कर्जफेडीसाठी मुदतवाढ द्यावी,”
— अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी (नुकसानग्रस्त व्यावसायिक)

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??