अभिनेते अशोक सराफ यांचा ‘विद्यारंभ-२५’ मध्ये सन्मान ; एमआयटी एडीटी विद्यापीठात बुधवारपासून तीन दिवसीय स्वागत समारंभ…

पुणे (हवेली) : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, लोणी काळभोर येथे नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘विद्यारंभ-२५’ या तीन दिवसीय भव्य समारंभाचे आयोजन बुधवार, ६ ऑगस्टपासून करण्यात आले आहे. यंदाच्या या विशेष उपक्रमात ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम ‘स्वामी विवेकानंद सभा मंडपात’ पार पडणार असून, विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, आयआयटी जोधपूरचे संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, दहशतवादविरोधी मोर्चाचे अध्यक्ष मनिंदर सिंग बिट्टा, यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. राजेश एस., प्रा. डॉ. सुनीता कराड, प्रा. डॉ. ज्योती ढाकणे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. महेश चोपडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, विविध उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक कार्यक्रम या काळात पार पडणार आहेत.
११ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन
दरम्यान, सोमवार, ११ ऑगस्ट रोजी एमआयटी एडीटी विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीही मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, पद्मश्री अशोक सराफ, इस्रोचे वैज्ञानिक डॉ. नागराजन वेदाचलम, आणि एमएनआयटीचे संचालक प्रा. डॉ. एन. पी. पाधी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Editer sunil thorat








