समाजातील गरजू रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा “डॉक्टर स्पेशल एंटरटेनमेंट धमाका”त सन्मान…

पिंपरी-चिंचवड (नवी सांगवी) : समाजातील गरजू आणि गरीब रुग्णांसाठी नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांना गौरविण्यासाठी एक आगळावेगळा व भव्य कार्यक्रम “डॉक्टर स्पेशल एंटरटेनमेंट धमाका” नुकताच निळू फुले नाट्यगृह, नवी सांगवी येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन डाॅ. धनश्री बोरगावे (RNC) आणि लक्ष्मण प्रधान (मायव्हॉईस) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गिफ्टींग पार्टनर म्हणून कावेडीया ज्वेलर्स प्रा. लि. यांचे सहकार्य लाभले.
डॉक्टरांचा सन्मान…
या उपक्रमाद्वारे गरीब रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा श्रीफळ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल जहांगीर रुग्णालयाच्या सोशल विभागाचे प्रमुख, वरिष्ठ डॉक्टर अशोक घोणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील आतापर्यंत 18,000 हून अधिक गरीब व गरजू रुग्णांचे हृदय, मेंदू, कॅन्सर, लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांटसारखे महागडे व जीव वाचवणारे शस्त्रक्रिया प्रकार मोफत किंवा अल्पदरात यशस्वीपणे पार पडले आहेत. त्यांच्या कार्यामुळे हजारो कुटुंबांना नवा श्वास मिळाला आहे.
याशिवाय पुणे जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभाग प्रमुख व नेत्र शल्यचिकित्सक डाॅ. अंजली कुलकर्णी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी नेत्र आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती…
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष मंगेश असवले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
रंगतदार सांस्कृतिक सादरीकरण…
डॉक्टरांच्या सन्मानाबरोबरच कार्यक्रमात मनोरंजनाचीही पर्वणी होती. संगीत क्षेत्रातील उभरता पार्श्वगायक करन कागले यांनी सुरेल गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गायकीने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
तसेच संयोजक लक्ष्मण प्रधान यांनी स्वतः सूत्रसंचालनासोबत काही गाणी सादर केली. त्यांच्या सहजसुंदर निवेदनामुळे आणि गायकीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली.
समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम…
या उपक्रमाचे प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी कौतुक केले. डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांना समाजात योग्य प्रतिष्ठा मिळवून देणे आणि गरजू रुग्णांसाठी त्यांच्या अथक प्रयत्नांना सलाम करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
“गरजू रुग्णांसाठी नि:स्वार्थ झटणाऱ्या डॉक्टरांचे हे कार्य म्हणजे खरे सामाजिक आराध्यत्व आहे. समाजातील अशा हिरोंचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे”, असे संयोजकांनी यावेळी सांगितले.
हा कार्यक्रम प्रथमच इतक्या भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला असून तो डॉक्टरांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा, त्यांच्या मनोबलाला उभारी देणारा आणि प्रेक्षकांचे मन जिंकणारा ठरला.
Editer sunil thorat





