अभिनेत्री व गायिका रसिका धामणकर यांच्या उपस्थितीत झाला मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम, अनुराधा ताईंच्या हस्ते गायकांना सन्मानचिन्ह प्रदान…
अनुराधा पौडवाल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नादब्रह्म संगीत अकॅडमी’ तर्फे सुरेल सोहळा...

मुलुंड : संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘नादब्रह्म संगीत अकॅडमी’ तर्फे हिंदी व मराठी गीतांचा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा सुरेल सोहळा 26 ऑक्टोबर रोजी सुयोग हॉल, मुलुंड येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य निलम पौडवाल, अनिता पौडवाल तसेच राजन टणक, संजीव टणक, अमिता टणक, प्रकाश राणे, ई. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन मुकुंद वीरकर यांनी काटेकोरपणे पार पाडले, तर सूत्रसंचालन सविता हांडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
रसिका धामणकर यांचा गुरुभावाचा अनोखा आविष्कार
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले नादब्रह्म संगीत अकॅडमीच्या संस्थापिका, अभिनेत्री आणि गायिका रसिका धामणकर यांचे भावपूर्ण सादरीकरण. रसिका धामणकर यांनी आपल्या लहानपणापासून संगीत क्षेत्रातील प्रेरणास्थान मानलेल्या अनुराधा ताई पौडवाल यांचे मंत्रघोषात विधीवत पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती आपल्या गुरुभावाची प्रचिती दिली. या प्रसंगाने सभागृहात उपस्थित सर्व संगीतप्रेमींच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
संगीताच्या सुरावटीतून व्यक्त झाला आदराचा भाव…
नादब्रह्म संगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी आणि मराठी अशा विविध गीतांच्या सुरावटींनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणानंतर अनुराधा पौडवाल यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व समाधान हे सर्व गायकांसाठी मोठे बक्षीस ठरले. कार्यक्रमादरम्यान अनुराधा ताईंच्या हस्ते सर्व गायकांना ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
संगीत साधनेला समर्पित ‘नादब्रह्म’
‘नादब्रह्म संगीत अकॅडमी’ ही गेल्या अनेक वर्षांपासून संगीत शिक्षण, गायन प्रशिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. रसिका धामणकर यांनी स्थापनेपासूनच अकॅडमीचे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पणाने चालवले आहे.
विजय धामणकर यांचा अभिमान…
या कार्यक्रमात रसिका धामणकर यांच्या पती आणि खबर सबसे तेज ग्रुपचे वालचंदनगर कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेशन प्रमुख विजय धामणकर यांचीही उपस्थिती विशेष ठरली. त्यांनी रसिका यांच्या संगीत प्रवासाचा व नादब्रह्म अकॅडमीच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमात संगीत, भावना आणि गुरुभक्ती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. अनुराधा पौडवाल यांच्या संगीतकारकीर्दीचा गौरव करत रसिका धामणकर आणि त्यांच्या शिष्यांनी दिलेला हा आदरभावाचा संगीतमय अभिवादन उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
Editer sunil thorat



