उरुळी देवाची येथे बैलगाडा शर्यतींचा थरार ; नागरिकांची मोठी गर्दी…

पुणे (हडपसर) : हडपसर सासवड रोडवर उरुळी देवाची येथे पुरंदर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अजितदादा केसरी भव्य बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी धनगरवस्ती येथील घाटावर जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले बैलगाडामालक आणि शौकिनांची मोठी गर्दी झाली होती. भिर्र… भिर्र… झाली… झाली… झाली… वाह रे पठ्ठ्या… मैदान मारलं, अशा आवेशपूर्ण आरोळ्यामध्ये बैलगाड्यांच्या चित्तथरारक शर्यती झाल्या. या शर्यतीमध्ये पहिल्या आठ क्रमांकास लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
उत्कृष्ट बैलगाडा चालकांना चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या बैलगाडा मालकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत भाडळे आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
या शर्यतीमध्ये अडीचशेपेक्षा जास्त बैलगाडे सहभागी झाले होते तसेच शर्यत पाहण्यासाठी सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त बैलगाडाप्रेमींची उपस्थिती होती. बैलगाडा शर्यतीस प्रमुख पाहुणे म्हणून महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशांत भाडळे व सहकार्यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते.



