“विद्यार्थ्यांनो, अपयशाला यशाची शिडी बनवा!” ; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन…
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : “विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यांना केवळ पुस्तकातील नव्हे, तर जीवनाशी निगडित शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट पदवी मिळवणे नसून, समाजाच्या उन्नतीसाठी ज्ञानाचा उपयोग करणे हेच खरे यश आहे,” असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
ते पुण्यातील विश्वराजबाग येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. राज्यपाल बागडे म्हणाले, “अपयश हे शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्यामुळे अपयशाला यशाची शिडी बनवा आणि भारताला जागतिक महासत्ता बनविण्यात आपला वाटा उचला.”
समारंभाला आयआयटी मंडीचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे अध्यक्ष रामानन रामनाथन, ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ सुभाष त्यागी, नारेडको अध्यक्षा स्मिता पाटील यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा म्हणाले, “भगवद्गीता आपल्याला समाधानी राहायला शिकवते. अनुभवाधारित शिक्षणच भारताला आत्मनिर्भर बनवू शकते.” रामानन रामनाथन यांनी भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील झपाट्याने होणाऱ्या प्रगतीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना संशोधन व नवोन्मेषासाठी प्रेरित केले.
‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ सुभाष त्यागी म्हणाले, “विद्यार्थीदशेत मी सरासरी होतो, पण मेहनतीची इच्छाशक्ती होती. आज माझी ‘गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीज’ १० हजार कोटींची उलाढाल करते व ४ हजारांना रोजगार देते. भारतात दररोज १ लाख टन काचेची मागणी असून उत्पादन केवळ २० हजार टन आहे — त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी सांगितले की, “एमआयटी एडीटी विद्यापीठाने नेहमीच मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला आहे. आता विद्यापीठ ‘२.० मोहिमे’तून आत्मनिर्भर भारतासाठी सक्षम विद्यार्थी घडविण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.”
या समारंभात रामानन रामनाथन यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.)’, तर सुभाष त्यागी यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स (D.Litt.)’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. तसेच डॉ. मंगेश कराड यांना ‘उत्कृष्टतेचे शिल्पकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या दीक्षांत सोहळ्यात २१ पीएचडी, २१ सुवर्णपदके आणि १९५ रँक होल्डर विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, तर ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला सुमारे ८ हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक आणि पाहुण्यांची उपस्थिती लाभली. राजदंडासह निघालेल्या मिरवणुकीने सोहळ्याला आकर्षक स्वरूप दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर, प्रा. स्वप्निल शिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सायली गणकर यांनी मानले. सोहळ्याची सांगता ‘पसायदान’ या मंगल ध्वनीने करण्यात आली.
Editer sunil thorat



