आंतरराज्य अंमली पदार्थ वाहतूक टोळीचा पर्दाफाश, वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई ; १०० किलो गांजा आणि कारसह २९.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

डॉ गजानन टिंगरे
वालचंदनगर (ता.इंदापूर) : पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ गांजाची वाहतूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळाले आहे. वालचंदनगर पोलिसांनी हैदराबादहून बारामतीकडे गांजा घेऊन जाणाऱ्या तस्करांच्या टोळीवर छापा टाकत १०० किलो गांजा आणि चारचाकी होंडा सिटी कार असा एकूण २९ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून आखला सापळा…
दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारास वालचंदनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, बावडा ते बारामती (बी.के.बी.एन. रोड) मार्गे एक होंडा सिटी कार (एमएच १२ डीवाय २०१२) मध्ये काही इसम गांजा घेऊन येत आहेत. पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तत्काळ ही माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (पुणे विभाग), गणेश बिरादार (बारामती विभाग) आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सुर्दशन राठोड यांना कळवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा–बारामती मार्गावर सापळा रचण्यात आला.
सिनेमॅटिक पद्धतीने अटक…
गोपनीय माहितीतील वाहनाची तपासणी सुरू असताना ती गाडी कळंब (ता. इंदापुर) परिसरात दिसून आली. पोलिसांच्या हालचाली लक्षात येताच चालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी पाठलाग करत कळंब गावातील डी.पी. चौकात गाडीला आडवे करून तीन इसमांना ताब्यात घेतले.
वाहन तपासणीदरम्यान डिकीत प्लास्टिकच्या दोन गोण्या सापडल्या. त्यामध्ये ९९.९४ किलो गांजा (किंमत ₹२४,९८,५००/-) आढळला. यासोबतच ₹५ लाख किंमतीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत ₹२९,९८,५००/- इतकी आहे. जप्तीची कारवाई नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
आरोपींची नावे आणि पार्श्वभूमी…
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे अशी आहेत, फिरोज अजिज बागवान (वय ३६, रा. कसबा बारामती, पुणे), प्रदीप बाळासो गायकवाड (वय २८, रा. मळद, ता. बारामती, पुणे), मंगेश ज्ञानदेव राऊत (वय २९, रा. मळद, ता. बारामती, पुणे)
चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ते आपल्या इतर तिघा साथिदारांच्या मदतीने हैदराबाद येथून गांजा आणून बारामती परिसरात विक्रीसाठी आणत होते. तपासादरम्यान फरार आरोपी अशरफ अजिज सय्यद (वय २९, रा. निरा वागज, ता. बारामती) यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कायदेशीर कारवाई…
या प्रकरणी पोलिस हवालदार गणेश काटकर यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा र.नं. ३६३/२०२५ प्रमाणे
अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act 1985) कलम ८(क), २०(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. प्रथमवर्ग न्यायालय, इंदापुर यांनी आरोपींना १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत. तपासादरम्यान या प्रकरणात आंतरराज्य स्तरावरील अंमली पदार्थ रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व पोलिसांचा सहभाग…
या यशस्वी कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी डॉ. सुर्दशन राठोड, तसेच स्थायी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. कारवाईत पोलीस हवालदार गणेश काटकर, उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार, सचिन गायकवाड, शरद पोफळे, महेश पवार, अभिजीत कळसकर, गणेश वानकर, राहुल माने, ओंकार कांबळे यांनी सहभाग नोंदवला.
राजकुमार डुणगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण म्हणाले की “अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका घेत आम्ही सतत कारवाई करत आहोत. गांजाच्या वाहतुकीत सामील असलेल्या टोळीचा पूर्ण मागोवा घेत असून, यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.”
Editer sunil thorat



