
पुणे : खराडी परिसरातील नागरिकांचा बोगस एस.आर.ए. प्रकल्प रद्द करावा, मोकळ्या जागेसह नव्याने लेआउट तयार करून मागासवर्गीय कुटुंबांना मालकीहक्काचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आज १९०व्या दिवशीही सुरूच आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, नागरिकांनी शांततामय पद्धतीने आपला हक्काचा लढा सुरू ठेवला आहे. नागरिकांची मागणी आहे की, अस्तित्वात असलेल्या वसाहतींचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांच्या मूळ जागेवरच करण्यात यावे तसेच जळीतग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी.
तसेच या मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा म्हणून मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांपासून या वसाहतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना विकासाच्या नावाखाली हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथाकथित एस.आर.ए. प्रकल्पांतर्गत काही बोगस विकासकांना लाभ मिळावा म्हणून गरीब, मागासवर्गीय आणि श्रमिक वर्गाचे नुकसान केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
आंदोलन समितीचे मार्गदर्शक राजेंद्र साळवे यांनी सांगितले की, “हे आंदोलन आमच्या अस्तित्वासाठी आणि जगण्याच्या हक्कासाठी आहे. शासन व स्थानिक प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”
नागरिकांना दररोज या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, दररोज सकाळी ११ ते १२ या वेळेत सर्व वसाहतीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळे आणि युवक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Editer sunil thorat



