
हवेली (पुणे) : केसनंद–कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या गटातून सर्वसाधारण महिला गटात सुरेखा रमेश हरगुडे यांना जिल्हा परिषदेची, तर केसनंद पंचायत समिती गणातून सर्वसाधारण पुरुष गटात संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या उमेदवारींची अधिकृत घोषणा शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी अष्टापुर फाटा येथे झालेल्या काशी–अयोध्या देवदर्शन आशीर्वाद मेळाव्यात हजारोंच्या उपस्थितीत केली.
या वेळी बोलताना आमदार कटके म्हणाले, “रमेश (बापू) हरगुडे यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे या गटात राष्ट्रवादी काँग्रेस बहुमताने विजयी होईल, असा मला विश्वास आहे. अजितदादा पवार, सुनील तटकरे व सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उमेदवार जाहीर केले आहेत.”
मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिलिंद (नाना) हरगुडे, शिवसेना तालुकाध्यक्ष विपुल शितोळे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब चौधरी, प्रभाकर जगताप आदींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरेखा रमेश हरगुडे व संतोष (एस.पी.) हरगुडे यांनी आमदार कटके यांचे आभार मानले. “आमदार माऊली आबांच्या मार्गदर्शनाखाली गट व गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे दोन्ही उमेदवारांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविक करताना मिलिंद (नाना) हरगुडे म्हणाले, “सुरेखाताई आणि एस.पी. हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली गट व गणाचा सर्वांगीण विकास होईल, यात शंका नाही. मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या. हे उमेदवार आपल्या कार्यातून विकासाची नवी दिशा देतील.”
मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यक्रमात “सेवा, विकास आणि समाजातील ऐक्य” यांचा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीचा बिगुल वाजवला आहे.
Editer sunil thorat







