
पुणे : फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेची प्रभाग रचना अखेर राज्य शासनाच्या मंजुरीसह अंतिम करण्यात आली असून संबंधित अधिसूचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९, १० आणि ३४१ब अन्वये ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. प्रारूप अधिसूचनेवर आलेल्या हरकती–सूचनांचा सखोल विचार करून ही अंतिम रचना निश्चित करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रमुख उदमले, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आणि जन माहिती प्रमुख अक्षय रोकडे यांनी संयुक्तपणे दिली.
१८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप अधिसूचनेनंतर नागरिकांकडून आलेल्या सर्व आक्षेपांची छाननी करून राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अंतिम निर्णय घेतला आहे. नव्याने स्थापन झालेल्या या नगरपरिषदेतील एकूण सदस्यसंख्या ३२ इतकी ठरवण्यात आली असून सर्व १६ प्रभाग दोन सदस्यीय ठेवण्यात आले आहेत. तीन सदस्यीय कोणताही प्रभाग नसल्याची स्पष्टताही अधिसूचनेत करण्यात आली आहे.
अंतिम प्रभाग रचना व त्यांची व्याप्ती अधिसूचनेत नमूद केलेल्या अनुसूचीप्रमाणे लागू होणार असून या रचनेनुसारच येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी होईल. अधिसूचनेच्या प्रसिद्धीपासून पुढील निकटच्या निवडणुकीसाठी ही रचना प्रभावी ठरणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
फुरसुंगी–उरुळी देवाची परिसरात स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीला ही अंतिम प्रभाग रचना अत्यंत महत्त्वाची ठरणार असून प्रशासनाकडून पुढील निवडणुकीसाठीची तयारीही वेगात सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
Editer sunil thorat



