लोणी काळभोरमध्ये एम.डी. ड्रग्जसह एक युवक अटक, १ लाख ८० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; युनिट–६ गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (पुणे) : पुणे शहर पोलिसांच्या युनिट–६ गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठी कारवाई करत लोणी काळभोर परिसरातील पाषाणकर बाग येथे एकाला जेरबंद केले आहे. संशयास्पद हालचालींवरून अटक करण्यात आलेल्या या युवकाकडून ७ ग्रॅम ९९ मिलीग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) असा तब्बल १ लाख ८० हजार ९२० रुपयांचा अंमली पदार्थ तसेच विक्रीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव अफसर अहेसान अन्सारी (वय ३१, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) असे आहे.
संशयास्पद हालचालींवर पोलिसांची नजर…
१९ नोव्हेंबर रोजी दुपारी युनिट–६ गुन्हे शाखेचे पथक नियमित पेट्रोलिंगसाठी रवाना झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तसेच सहकाऱ्यांनी पुणे–सोलापूर महामार्गावर १५ नंबर चौक, शेवाळवाडी टोलनाका, कवडीपाट मार्गे लोणी काळभोर परिसरात प्रवेश केला.
पाषाणकर बाग, काळभोर हाइट्ससमोर सार्वजनिक रस्त्यावर एक इसम संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला काही अंतरावर पकडले.
झडतीत उघड झाला अंमली पदार्थांचा साठा…
अफसर अहेसान अन्सारीची झडती घेतली असता त्यांच्याकडे पुढील साहित्य आढळून आले – एम.डी. ड्रग्ज – ७ ग्रॅम ९९ मिलीग्रॅम (किंमत : १,८०,९२० रुपये)—सॅमसंग मोबाईल फोन – किंमत २०,००० रुपये—इलेक्ट्रॉनिक वजनकाटा—झिप-लॉक पाउच, प्लास्टिक पिशवी, चमचा
या साहित्यावरून आरोपी अंमली पदार्थाचे वजन करणे, पॅकिंग करणे व विक्रीसाठी तयार ठेवणे अशा कामांमध्ये सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे.
कारवाईत सहभागी पोलिस अधिकारी…
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, हवालदार नितीन मुंढे, महाडिक, गोसावी, चालक पोलीस शिपाई बास्टेवाड तसेच युनिट–६ चे एपीआय मदन कांबळे व पथकातील सकटे, कारखिले, पानसरे यांच्या सहकार्याने करण्यात आली. पोलिस अथक प्रयत्नांनी संशयिताला पळ काढण्यापासून रोखले आणि त्याच्याकडील सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.
गुन्हा दाखल ; पुढील तपास सुरू
या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मारुती मुंढे यांनी फिर्याद नोंदवली आहे. अन्सारीवर एन.डी.पी.एस. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करत आहेत.
एम.डी.च्या जाळ्यावरील मोठा आघात…
लोणी काळभोर परिसरात व surrounding भागात अलीकडेच एम.डी.ची अवैध सर्रास विक्री वाढत असल्याने पोलिसांनी गस्त आणि गुप्त चौकशी वाढवली आहे. युनिट–६ च्या या कारवाईमुळे ड्रग्ज पुरवठा साखळीवर मोठा धक्का बसला असून आणखी काही साथीदारांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले असून या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे स्वागत केले आहे.
Editer sunil thorat



