
पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार यंदाचा गणेशोत्सव हा “राज्य उत्सव” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करत लोणी काळभोर पोलीस ठाण्यांतर्फे दररोज विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमांतून समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेत पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
मतिमंद विद्यार्थ्यांना आरतीचा मान…
दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित गणेश आरतीचा मान महावीर निवासी मतिमंद विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आरती करून गणेशदर्शन घेतले. यावेळी त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. समाजातील दुर्लक्षित घटकांना प्रोत्साहन देत लोणी काळभोर पोलीसांनी संवेदनशीलतेचे व समाजाभिमानाचे उदाहरण घालून दिले.
ज्येष्ठांचा गौरव…
याच दिवशी संध्याकाळी झालेल्या गणेश आरतीत लोणी काळभोर व कुंजीरवाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठांनी पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “अशा प्रकारे पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आम्हाला सन्मान मिळतो आहे, हे प्रथमच घडले आहे. त्यामुळे पोलीसांप्रती आमच्यातील आदर व सद्भावना आणखी दृढ झाली आहे,” असे ज्येष्ठांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
जनजागृतीचे विविध उपक्रम…
गणेशोत्सव काळात लोणी काळभोर पोलीस ठाण्यांतर्फे रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, स्त्रियांवरील अत्याचार प्रतिबंधासाठी एकपात्री नाटिका, व्यसनमुक्तीवरील नाट्यप्रयोग, मोबाईलच्या अतीवापराचे दुष्परिणाम सांगणारे पथनाट्य, तसेच सायबर क्राईम विषयावरील व्याख्यान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परिसरात पोलीसांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोच…
या उपक्रमांमुळे पोलीस-जनता संबंध दृढ होत आहेत. गणेशोत्सवासारख्या धार्मिक-सामाजिक उत्सवाच्या माध्यमातून “राज्य उत्सव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा प्रयोग उल्लेखनीय ठरत आहे.
Editer sunil thorat






