महसूल विभागातील धक्कादायक कारवाई : हवेली तालुक्यातील तीन महिला तलाठी लाचखोरी प्रकरणी अडकल्या…

पुणे : महसूल विभागातील सर्वात मोठी झाडाझडती करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) हवेली तालुक्यातील तिन महिला तलाठ्यांवर एकाच वेळी कारवाई करून लाचखोरीचे मोठे जाळे उघड केले आहे. हस्तलिखित सातबारा, संगणकीकृत सातबारा आणि आठ अ उतारा या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी शासकीय शुल्काबरोबरच लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गुरुवारी (दि.२५ सप्टेंबर) झालेल्या या कारवाईत खडकवाडी-कुडजे येथील तलाठी शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (वय ४० वर्षे) यांना तब्बल २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्या पुणे-मांजरी बुद्रुक येथील कृष्णकुंज सोसायटीत वास्तव्यास आहेत.
याशिवाय, प्रेरणा बबन पारधी (वय ३० वर्षे), तलाठी सांगरूण व दिपाली दिलीप पासलकर (वय २९ वर्षे), तलाठी बहुली यांच्याविरुद्ध देखील नागरिकांकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारधी या पाषाण परिसरात तर पासलकर कोंढवा येथे वास्तव्यास आहेत.
लाचेची मागणी कशासाठी?
हवेली तालुक्यातील या तिन्ही महिला तलाठ्यांकडून नागरिकांना
हस्तलिखित सातबारा
संगणकीकृत सातबारा
८ अ उतारा
या महसुली कागदपत्रांसाठी लाचेची मागणी केली जात असल्याचे तक्रारीतून स्पष्ट झाले होते. शेतकरी व नागरिकांना आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळता लाच देणे भाग पडत होते.
मोठी झाडाझडती – विभाग हादरला…
महसूल विभागातील या कारवाईमुळे संपूर्ण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांच्याच अशा प्रकरणात सहभागामुळे गावकरी व शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. एकाच तालुक्यात एकाचवेळी तीन महिला तलाठ्यांवर कारवाई होणे ही अभूतपूर्व घटना मानली जात आहे.
पुढील कारवाई…
एसीबीने तीनही प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले असून सखोल तपास सुरू आहे. लाचखोरीच्या या कारवायांमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला नवा वेग मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी असलेल्या महसूल अधिकाऱ्यांनीच नागरिकांना लाच द्यायला भाग पाडल्यामुळे या कारवाईकडे ‘आदर्श दाखवणारी मोहिम’ म्हणून पाहिले जात आहे.
Editer sunil thorat



