
पुणे (हवेली) : ०७ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, हवेली तालुका गुणवत्तेच्या यादीत जिल्ह्यात खालून सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. या निकालाने हवेली तालुक्यातील शैक्षणिक कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हवेली तालुक्यातून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४,४२५ विद्यार्थी बसले होते. यामध्ये केवळ ८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी फक्त २९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. म्हणजेच तब्बल ३,३८० विद्यार्थी परीक्षेत अपात्र ठरले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरूर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांनी गुणवत्तेच्या यादीत वरचे स्थान कायम ठेवले आहे.
शाळा आणि शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न…
हवेली तालुक्यात सुसज्ज शाळा, भौतिक सुविधा, दर्जेदार शिक्षक यांचा भरणा असूनही निकालात अशी घसरण का? यावरुन शाळांची गुणवत्ता आणि शिक्षकांची कार्यपद्धती तपासण्याची गरज अधोरेखित होते. नागरिकांमधून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे केवळ विद्यार्थ्यांचे अपयश नसून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची गंभीर हकालपट्टी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात येत आहे.
शिक्षण क्षेत्रातील गळती की प्रशासनाची उदासीनता?
गुणवत्तेच्या यादीत जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी शेवटून सहावा क्रमांक मिळाल्याने हवेली तालुक्यातील शैक्षणिक पिछेहाट स्पष्ट झाली आहे. शासनाने पुरवलेले सर्व शैक्षणिक संसाधन, शिक्षकांची संख्या आणि शिक्षणासाठी उपलब्ध असलेले बजेट असूनही निकालात मोठी घसरण ही प्रशासन व शिक्षकांची निष्काळजीपणा दर्शवते.
अधिकारी आणि शिक्षकांवर कारवाईची गरज…
गटशिक्षणाधिकारी ते जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकारी केवळ कागदोपत्री कामकाज करतात, शाळांना भेटी देत नाहीत आणि कामचुकार शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी जनतेची तीव्र टीका आहे. अनेक शिक्षक शाळेच्या वेळेत अनुपस्थित असतात, वर्गखोल्यांऐवजी सोशल मीडियावर सक्रिय असतात, असे चित्र सामान्य झाले आहे.
स्थानिकांचा सूर — “गावोगाव शैक्षणिक चर्चा होणे गरजेचे”
सामान्य गावकरी, पालक व स्थानिक नागरिकांनी राजकारण व अर्थकारणाच्या चर्चेसोबत गावागावात शिक्षण क्षेत्राचीही चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. “गुणवत्तेची घसरण ही साखळी प्रतिक्रिया आहे — शिक्षक, अधिकारी आणि समाज यांचे सामूहिक अपयश आहे,” असे एक पालक म्हणाले.
निष्कर्ष…
या परीक्षेचा निकाल हवेली तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेसाठी इशारा असून, यावर वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान अटळ आहे. शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अचानक भेटी, कठोर निरीक्षण आणि जबाबदार शिक्षकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अन्यथा “शैक्षणिक सुविधा असूनही गुणवत्तेचा अभाव” हा विरोधाभास कायम राहील.
तुळशीराम घुसाळकर पुणे



