तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे रामजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने अपुर्व उत्साहात व भक्तीभावाने साजरा…

पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे आज रामजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने अपुर्व उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारची सुट्टी, दहावी व बारावीच्या संपलेल्या परिक्षा यामुळे नेहमीपेक्षा यावर्षी भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती.
तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक १००८ देविपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी गेल्या साठ वर्षांपुर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आजही पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती करण्यात आली. दुपारी ढोल ताशांच्या गजरात “श्री” समवेेत धुंदीबाबा व मंगलपूूूरी महाराज यांच्या पादूूूकांंची मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात तरवडी – रानमळा, केसकरवस्ती, वडकी येथील धनगर समाज बांधव तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, सातारासह महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेंच परप्रांतातून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाची आरती करण्यात आली. त्यानंतर भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. पाडव्यापासूूून सुरू असलेल्या अखंंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता झाली.
रामजन्माचा सोहळा झाल्यानंंतर भात, आमटी, बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला. दर्शन व प्रसाद घेण्यासाठी आबालवृद्ध, महिला, तरुण भक्तांची झुंबड उडाली होती. स्वयंसेवक भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग व्यवस्थित व्हावे म्हणून उपाययोजना करताना दिसत होते. यांमुळे आलेली दुचाकी व चारचाकी वाहने मुख्य प्रवेशद्वाराच्या सुमारे एक हजार फूट अलीकडेच थांबवल्याने भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवला नाही. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. रात्री उशिरापर्यंत विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत होते.
पीएमपीएमएलच्या वतीने हडपसर ते रामदरा दरम्यान बससेवा सुरू करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. मात्र काही ठिकाणी रस्त्याची दूरावस्था झाली असून रस्ता दुरुस्त करून रुंदीकरण करण्याची गरज आहे अशी चर्चा भाविकांमध्ये चालू होती. अरुंद रस्ता, दुचाकी व चारचाकी वाहनांची व भाविकांची प्रचंड संख्या यामुळे पुणे कोल्हापूर लोहमार्गावरील पूलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पीएमपीएमएलने सुरू केलेली बससेवा, व्हाॅटस अप, फेसबुक सारख्या समाज माध्यमातून झालेला प्रचार व विविध माध्यमात छापून आलेल्या बातम्या, रविवारची सुट्टी व दहावी, बारावीच्या संपलेल्या परीक्षा आदी कारणांमुळे आज तीर्थक्षेत्र रामदरा येथे न भूतो न भविष्यती अशी भाविकांची गर्दी झाली होती.





