माजी उपसरपंच अमित पवार यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन; आमदार विजय शिवताऱ्यांचा दृढ पाठिंबा…
शेवाळवाडी–मांजरी परिसरात ‘सांस्कृतिक व सायन्स थीम पार्क’ उभारण्याची मागणी...

शेवाळवाडी (हडपसर) : पूर्व पुण्यात गत काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले असले तरी, शेवाळवाडी, मांजरी, केशवनगर व साडेसतरानळी या नव्याने समाविष्ट झालेल्या भागात अद्याप मूलभूत शहरी सुविधा उपलब्ध नाहीत. सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने, सांस्कृतिक केंद्रे, जेष्ठ नागरिकांसाठी बगिचे तसेच मुलांसाठी सुरक्षित विरंगुळा स्थळांचा स्पष्ट अभाव जाणवतो. नागरिकांच्या या वाढत्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नेते व माजी उपसरपंच अमित पवार यांनी महत्त्वाची पुढाकार घेत ‘सांस्कृतिक व सायन्स थीम पार्क’ उभारण्याची मागणी केली आहे.
अमेनिटी प्लॉट्स पडीत अवस्थेत राहू नयेत आणि भविष्यात अतिक्रमण होण्याची शक्यता टाळावी, यासाठी महापालिकेने तातडीने हे प्लॉट्स ताब्यात घेऊन विकासकामे सुरू करावीत, असे निवेदन पवार यांनी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम (IAS) यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले.
पवार यांनी निवेदनात स्पष्ट केले की परिसरात…
– मुलांना खेळण्यासाठी मोठी व सुरक्षित मैदाने नाहीत,
– महिलांसाठी चालण्याचे व व्यायामाचे स्वतंत्र सार्वजनिक क्षेत्र नाही,
– जेष्ठांसाठी विश्रांती देणारी शांत उद्याने उपलब्ध नाहीत,
– सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी योग्य जागांची उणीव आहे.
थीम पार्कमध्ये विज्ञान गॅलरी, रोबोटिक्स–AI झोन, ओपन जिम, निसर्ग उद्यान, प्लॅनेटेरियम मॉड्यूल, आधुनिक खेळणी उद्यान, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अम्फीथिएटर अशा बहुपयोगी सुविधा विकसित करता येतील.
या पुढाकाराला पुरंदर–हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांनीही संपूर्ण पाठिंबा देत, “या भागाचा शहरी दर्जा वाढवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त आहे. आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा मी करणार,” असे आश्वासन दिले.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले असून, थीम पार्क उभारल्यास परिसराचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Editer sunil thorat



