सहा महिन्यांचा लपंडाव संपला ; मोका गुन्ह्यातील आरोपी गणेश आष्टुळला वानवडी पोलिसांची शिताफीची सापळा कारवाई…

वानवडी (हडपसर) : हडपसर परिसरातील काकासाहेब शिरोळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून सहा महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देत फरार राहणाऱ्या मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश दीपक आष्टुळ (वय २१, रा. शिंदेवस्ती, एसआरए सोसायटी, हडपसर) याला वानवडी पोलिसांनी शेवटी पर्वती परिसरातून शिताफीने सापळा रचून अटक करण्यात यश मिळवले आहे. दि. ४ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता शिंदेवस्तीतील एसआरए बिल्डिंग परिसरात फिर्यादी काकासाहेब शिरोळे हे रिक्षामध्ये गाणी ऐकत नातेवाईकांची वाट बघत बसलेले असताना आरोपी गणेश आष्टुळ व त्याच्या साथीदारांनी रिक्षातील साऊंड बंद करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपींनी लोखंडी कोयते, लाकडी दांडके इत्यादी शस्त्रांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २७३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील १०९, ११८(२), १८९(२), १९१(१)(२)(३), १९०, ३५१(२)(३), तसेच आर्म्स अॅक्ट ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोका कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. इतर आरोपी आधीच ताब्यात असून मुख्य आरोपी गणेश आष्टुळ मात्र घटनेनंतर पळ काढून सतत ठिकाणे बदलत पोलिसांना चकवण्यात यशस्वी ठरत होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास पथक सतत त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. याच दरम्यान पोलीस अंमलदार विष्णू सुतार व विठ्ठल चोरमले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी गणेश आष्टुळ पर्वतीमधील जनता वसाहत, शंकर मंदिराजवळ आपले अस्तित्व लपवून वावरत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोउनि अल्फाज शेख आणि पथकाने तत्काळ त्या भागात धडक दिली. परिसरात शोधमोहीम सुरू असताना आरोपी दिसताच पोलिसांनी कोणतीही गडबड न होऊ देता अत्यंत शिताफीने त्याला सापळ्यात अडकवून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याची कबुलीही दिली असून तपासात त्याचा सहभाग स्पष्टपणे सिद्ध झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
गणेश आष्टुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ५०९, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ अंतर्गत गुन्हा रजि. नं. १६४४/२०२३ दाखल आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि स्थानिक परिसरातील दहशत लक्षात घेता पोलिसांनी त्याच्या अटकेला विशेष महत्त्व दिले.
ही कारवाई परिमंडळ ५ च्या पोलीस उप-आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोउनि अल्फाज शेख आणि पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड आणि अर्शद सय्यद यांच्या पथकाने केली. वानवडी पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Editer sunil thorat



