लोणी काळभोरच्या हर्षदा संदीप काळभोरची ‘खेलो इंडिया’साठी ऐतिहासिक निवड…
संगिता–संदीप काळभोर यांच्या कन्येचे घवघवीत यश; शेतकरी कुटुंबाचा मान उंचावला...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर लोणी काळभोर येथील हर्षदा संदीप काळभोर हिने क्रीडा क्षेत्रात भरीव यश संपादन करत शेतकरी कुटुंबाचा मान अभिमानाने उंचावला आहे. सर्वसाधारण संगिता काळभोर व संदिप काळभोर या कुटुंबातून पुढे आलेल्या हर्षदाने लहानपणापासूनच खेळाची आवड जोपासत सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.
हर्षदाचे बारावीपर्यंतचे शिक्षण एंजल हायस्कूल येथे झाले. शालेय जीवनातच तिने हॉकी, क्रिकेट, फुटबॉल आणि हायजम्प अशा विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. विशेषतः फुटबॉलमध्ये गोलकिपर आणि डिफेंडर म्हणून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. आंतरशालेय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तिच्या कामगिरीची दखल घेण्यात आली होती.
सध्या ती आगाशे कॉलेज येथे बी.पी.एड.चे शिक्षण घेत असून महाविद्यालयीन स्तरावरही तिने चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. विद्यापीठस्तरीय स्पर्धांतील उत्कृष्ट प्रदर्शनामुळे तिची निवड Savitribai Phule Pune University च्या संघात झाली. पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर आणि नाशिक या विभागांतील खेळाडूंमधून निवड झालेल्या संघात तिने आपले स्थान भक्कम केले.
मध्यप्रदेशातील रिवा येथे ७ ते १६ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या वेस्ट-झोन स्पर्धेत देशभरातील ५५ विद्यापीठ संघ सहभागी झाले होते. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले. त्यानंतर २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान तमिळनाडूतील Annamalai University येथे झालेल्या ऑल इंडिया विद्यापीठ स्पर्धेत संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या भरीव यशाच्या जोरावर हर्षदाची ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली.
विशेष म्हणजे, २०२५ साली Indian Blind Football Federation च्या भारतीय महिला संघात गोलकिपर म्हणून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने तिच्या कारकिर्दीला नवे परिमाण लाभले आहे.
महाराष्ट्रातून ‘खेलो इंडिया’साठी मुला-मुलींची प्रथमच झालेली निवड ठरल्याने हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा इतिहासातही हा सुवर्णअध्याय ठरला आहे.
हर्षदाच्या या यशामुळे लोणी काळभोर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आई संगिता काळभोर व वडील संदीप काळभोर यांच्या शेतकरी कुटुंबातील या लेकीने क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेत परिसराचा मान वाढवला आहे. पुढील काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी कामगिरी करण्याचा तिचा निर्धार आहे.
Editer sunil thorat






