
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी या जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गणांच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केले असून, त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केल्याने निवडणूक लढतीचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे.
भारतीय जनता पक्षाकडून लोणी काळभोर–कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गटातून पूनम बाबुराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सामाजिक, महिला व स्थानिक विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या पूनम गायकवाड यांच्यावर पक्षाने विश्वास टाकत जिल्हा परिषदेसाठी संधी दिली आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि स्थानिक जनतेशी असलेली जवळीक हे त्यांच्या उमेदवारीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जात आहे.
पंचायत समिती गणांच्या बाबतीतही भाजपने ठोस निर्णय घेतला आहे. कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून ज्ञानेश्वर सूर्यकांत नामुगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेले काम लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
लोणी काळभोर पंचायत समिती गणातून श्वेता कमलेश काळभोर यांना उमेदवारी देण्यात आली असून, महिला सक्षमीकरण, शिक्षण व स्थानिक नागरी प्रश्नांवर सक्रिय असलेले त्यांचे कार्य पक्षासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपकडून उमेदवारांची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या गटात भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार यांच्यात चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता असून, सर्वच पक्ष आपापली ताकद पणाला लावण्याच्या तयारीत आहेत.
विकासकामे, स्थानिक प्रश्न, नेतृत्व आणि संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार असून, लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी परिसरात येत्या काळात प्रचाराचा जोर अधिक वाढणार आहे. भाजपने उमेदवार जाहीर करून निवडणूक रणांगणात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
Editer sunil thorat






