
लोणी काळभोर (ता. हवेली) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवार (दि.२१) रोजी संपताच लोणी काळभोर गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सह अपक्षांची या प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून निवडणूक रिंगणात थेट ताकद लावली आहे. त्यामुळे या गटात अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
लोणी काळभोर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव असल्याने या जागेकडे सर्वच पक्षांचे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. या गटातून विजय मिळवणे हे केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता पक्षाच्या ताकदीचे प्रतीक मानले जात असल्याने प्रत्येक पक्षाने सर्वतोपरी तयारी केली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक ही केवळ उमेदवारांमधील नव्हे, तर थेट पक्षीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
भाजपने या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी पूनम बाबुराव गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी श्वेता कमलेश काळभोर आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर नामुगडे यांची नावे जाहीर करून भाजपने संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या गटात ताकदीची मांडणी करत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी रेश्मा काळभोर आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अमोल टेकाळे यांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीकडूनही ही निवडणूक गांभीर्याने घेतली जात असून पक्षाची पारंपरिक मतपेढी सांभाळत विजय मिळवण्यावर भर दिला जात आहे.
शिवसेना (शिंदे गट) नेही स्वतंत्र ताकद दाखवत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी सिम्पल गणेश कांबळे, लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी नंदिनी हेमंत कोळपे, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी विजय भागवत दाभाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे गटाकडून प्रचाराची तयारी सुरू झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे.
दरम्यान, या गटात आघाडीही निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आघाडीकडून लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी अनिता सूर्यकांत गवळी, लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी सुवर्णा काळभोर आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी प्रकाश नारायण भिसे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. आघाडीने अधिकृत घोषणा केल्यास या गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
गुरुवार (दि.२२) रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतर कोणाचे अर्ज वैध ठरतात, कोण बाद होतात आणि कोण माघार घेतात, यावर लोणी काळभोर गटातील निवडणुकीचे अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. छाननीनंतर आणि माघारीच्या टप्प्यानंतरच खरी लढत कोणाकोणामध्ये होणार, हे स्पष्ट होणार असल्याने पुढील काही दिवसांत लोणी काळभोर गटातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.
Editer sunil thorat



