हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विशेष मतदान केंद्रांची उभारणी…

कदमवाकवस्ती : हवेली तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध घटकांसाठी विशेष मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदारांना सुलभ, सुरक्षित व समावेशक वातावरणात मतदान करता यावे, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, अर्चना निकम तसेच नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असल्याने मतदारांच्या विविध गरजा लक्षात घेऊन मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना मनुष्यबळ कक्षाचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद भांड यांच्यासह साहीर सय्यद, धम्मदीप सातकर, भूमेश मसराम, प्रियांका शिंगाडे, अश्विनी कुलकर्णी, सरस्वती पोंदे, स्मिता बगाटे, मैथिली माने व स्नेहल शेलार तसेच माध्यम कक्षाचे प्रा. योगेश हांडगे यांनी सांगितले की, या विशेष मतदान केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक गटातील मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना, आत्मविश्वासाने आणि सुरक्षित वातावरणात मतदान करता यावे हा आहे. मतदान केंद्रांची संख्या, मतदारसंख्या तसेच आवश्यक भौतिक व मानवी सुविधा यांचा विचार करून ही व्यवस्था आखण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेस व सोयीसाठी लोणी काळभोर येथे महिला (पिंक) मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रावर केवळ महिला अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व आरामदायी वातावरणात मतदान करता येणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढवणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या केंद्रामागील प्रमुख उद्देश आहे.
तसेच स्थानिक वैशिष्ट्ये, संस्कृती व परिसराची ओळख जपण्यासाठी उरुळी कांचन येथे ‘युनिक’ (Unique) मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात स्थानिक संस्कृती, कला, परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण सजावट यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे मतदारांना आपुलकीचा आणि सकारात्मक मतदान अनुभव मिळणार आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदारांचा उत्साह व सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पारंपरिक पद्धतींचे पालन करणाऱ्या महिलांसाठी खेडशिवापूर येथे पर्दानशीन मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये महिलांना पूर्ण गोपनीयता व सुरक्षितता देण्यात आली असून, सामाजिक व सांस्कृतिक कारणांमुळे मतदानात सहभागी होण्यास अडचण येणाऱ्या महिलांसाठी ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या विशेष मतदान केंद्रांच्या स्थापनेमुळे अधिकाधिक मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होतील, असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी व्यक्त केला आहे. विविध घटकांच्या गरजा लक्षात घेऊन मतदान सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, त्यामुळे हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अधिक समावेशक, पारदर्शक व यशस्वी ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Editer sunil thorat



