चिकनच्या दुकानातच कर्मचाऱ्याची आत्महत्या ; कारण अस्पष्ट…

तुळशीराम घुसाळकर
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका चिकन दुकानात काम करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात सोमवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
विराजुल हायातुल्ला शेख (वय २५, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत तरुणाचे नाव असून, तो संबंधित चिकन सेंटरमध्ये काम करत होता. याप्रकरणी सौरभ काळभोर (वय २७, रा. बाजार मळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराजुल शेख हा “पुणे पोल्ट्री चिकन सेंटर” येथे नोकरीस होता. सोमवारी सायंकाळी दुकानातच वायरच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. ही बाब लक्षात येताच तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने शेख याला तातडीने उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नसून, या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat



