मांजरीत धक्कादायक प्रकार! गाठीऐवजी ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशय काढले ; साई केअर रुग्णालयच्या चार डॉक्टरांवर गुन्हा…

मांजरी (हडपसर), पुणे : गर्भाशयातील छोटी गाठ काढण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ३५ वर्षीय महिलेचे संमतीशिवाय संपूर्ण गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी मांजरी बुद्रुक येथील साई केअर रुग्णालयमधील चार डॉक्टरांसह एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार महिला केशवनगर परिसरात वास्तव्यास असून त्या ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करतात. २०२३ साली केलेल्या सोनोग्राफी तपासणीत त्यांच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे निदर्शनास आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या नियमित औषधोपचार घेत होत्या. मात्र, कालांतराने त्रास वाढू लागल्याने त्यांनी पुन्हा तपासणी केली. त्यानंतर १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना मांजरी बुद्रुक येथील साई केअर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सोनोग्राफी अहवाल पाहून संबंधित डॉक्टरांनी लेझर शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयातील गाठ काढावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
घरी परतल्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच महिलेला पुन्हा तीव्र वेदना आणि त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी पुन्हा वैद्यकीय तपासणी केली असता, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचे संपूर्ण गर्भाशय काढून टाकण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. विशेष म्हणजे रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज समरीमध्ये गर्भाशय काढल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गाठ काढण्यासच परवानगी दिली होती, गर्भाशय काढण्यास कधीही संमती दिली नव्हती, असे तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले आहे. डॉक्टरांकडे जाब विचारला असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख तसेच सूरज कांबळे यांच्याविरोधात रुग्णाचे जीवित धोक्यात आणल्याप्रकरणी कलम १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरी पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत रुग्णालयाकडील सर्व वैद्यकीय कागदपत्रे, संमतीपत्र (कन्सेंट फॉर्म), शस्त्रक्रियेचा अहवाल आणि संबंधित नोंदी जप्त केल्या आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या प्राथमिक अहवालात वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे नमूद करण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे खासगी रुग्णालयांमधील उपचार पद्धती, रुग्णांची लेखी संमती, शस्त्रक्रियेतील पारदर्शकता आणि वैद्यकीय जबाबदारी या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Editer sunil thorat



