
हवेली (पुणे) : “शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांच्या माध्यमातूनच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पोहोचू शकतात. समावेशित शिक्षणाच्या संकल्पनेतून प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला सन्मानाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केले.
हवेली तालुक्यातील १४५ मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी आयोजित समावेशित शिक्षण सक्षमीकरण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती विद्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी निलेश धानापुणे, तज्ञ मार्गदर्शक वैभव पोरे, डॉ. पल्लवी फुलपगार, गायत्री नवले, मोनिषा तसेच प्राचार्य कश्मीरी शाहेदा उपस्थित होते.
युवराज काकडे यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या विविध सवलती व सुविधा दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे.
उपसभापती विद्या गायकवाड यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, कोणत्याही दिव्यांग विद्यार्थ्याला शाळेत प्रवेशापासून वंचित ठेवू नये. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर लक्ष ठेवण्यात येणार असून, अशा विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात शिक्षकांनी पालकांशी सातत्याने समन्वय ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत दिव्यांगत्वाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन अक्षमता (Learning Disability) या विषयावर मोनिषा, डॉ. पल्लवी फुलपगार आणि गायत्री नवले यांनी विद्यार्थ्यांची ओळख व अध्यापन पद्धती स्पष्ट केल्या. समावेशित शिक्षणाचे महत्त्व या विषयावर वैभव पोरे यांनी मार्गदर्शन केले, तर विशेष शिक्षक नवनाथ दर्शिले यांनी ‘प्रशस्त’ अॅपविषयी माहिती दिली.
‘२१ दिव्यांग प्रवर्ग ओळख’ या विषयावर विशेष शिक्षिका सुवर्णा पुंडे यांनी कायद्यानुसार असलेल्या विविध प्रवर्गांची माहिती दिली. आनंददायी शिक्षण व शासकीय सवलती यावर विशेष शिक्षक संतोष देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी तालुक्यातील शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. विशेष शिक्षकांच्या सहकार्यामुळे ही गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलेश धानापुणे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा पुंडे, गोपाळ शिवशरण, बबीता चव्हाण, ज्योती वाल्हेकर, साहीर सय्यद, बाळू चव्हाण, दिशा शेवाळे आणि सुनीता गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Editer sunil thorat




