
हडपसर (पुणे) : (दि. १८ मार्च २०२६) हडपसर येथील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी (दि. १८) महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मृणालिनी आहेर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे होते.
डॉ. आहेर यांनी आपल्या भाषणात रयत शिक्षण संस्था ही त्याग आणि समर्पणाच्या पायावर उभी असल्याचे सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यासोबतच लक्ष्मीबाई (लक्ष्मी वहिनी) यांचे योगदानही अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सुमारे ८० तोळे दागिने संस्थेसाठी अर्पण करून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या त्याग व सेवाभावातून प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच अहिल्याबाई होळकर, ताराराणी भोसले, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे यांच्या कार्याचा संदर्भ देत महिलांनी स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाने समाजात वावरावे, असा संदेश त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे यांनी रयत शिक्षण संस्था ही केवळ संस्था नसून एक सामाजिक चळवळ असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात संस्थेची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी सुमारे पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, वीस हजार सेवक संस्थेच्या कार्यात योगदान देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य प्रा. (डॉ.) दिनकर मुरकुटे यांनी करून दिली. आभार प्रदर्शन डॉ. अतुल चौरे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. छाया सकटे यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) किशोर काकडे तसेच आयक्यूएसी समन्वयक प्रा. संजय अहिवळे उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat





