सातबारातील फेरफार प्रकरणात उचलबांगडी ; तहसीलदारांसह 15 महसूल अधिकारी सक्तीच्या रजेवर
कलम 155 चा गैरवापर उघड ; 152 अधिकाऱ्यांवर ठपका, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष...

पुणे : महसूल अभिलेखांमध्ये सातबारावर अनधिकृत फेरफार केल्याच्या गंभीर आरोपांवर राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत 15 महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. कलम 155 चा गैरवापर करून जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ तसेच मालकी हक्कात बदल करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात एकूण 152 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. त्यापैकी प्रथम टप्प्यात 15 अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून उर्वरित 137 अधिकाऱ्यांवर पुढील टप्प्यात कारवाई होणार का, याकडे नागरिकांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीने तपासलेल्या 2,337 प्रकरणांपैकी 13 प्रकरणे ‘अ’ वर्गवारीतील अतिगंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षानंतर राज्य शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत कारवाईची प्रक्रिया गतीमान केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोषींना कुठलीही सवलत दिली जाणार नाही, असा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सातबारातील फेरफार प्रकरणामुळे जमीन व्यवहारांवरील विश्वास डळमळीत झाला असून, शासनाने ही कारवाई करत महसूल विभागात पारदर्शकता आणि शिस्त प्रस्थापित करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे…
1) गीता गायकवाड – तत्कालीन अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड; सध्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी
2) ज्योती देवरे – तत्कालीन तहसीलदार, खेड; सध्या अपर तहसीलदार, मालेगाव (नाशिक)
3) रविंद्र सबनीस – तत्कालीन तहसीलदार, जुन्नर; सध्या सहाय्यक प्राध्यापक, रामेती (RAMETI), पुणे
4) व्यंकटेश माधवराव भोसले – तत्कालीन मंडळ अधिकारी, जुन्नर; सध्या मंडळ अधिकारी, आंबेगाव
5) प्रल्हाद पाटील – तत्कालीन महसूल सहायक, जुन्नर; सध्या महसूल सहायक, आंबेगाव
6) श्रीकांत पाटील – तत्कालीन तहसीलदार, इंदापूर; सध्या विशेष भूसंपादन अधिकारी, धाराशिव
7) मलाप्पा तम्मा ढाणे – तत्कालीन मंडळ अधिकारी, बावडा (इंदापूर); सध्या मंडळ अधिकारी, जुन्नर
8) मधुसुधन बर्गे – तत्कालीन तहसीलदार, मावळ; सध्या उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), नागपूर
9) मारुती महादेव चोरमले – तत्कालीन मंडळ अधिकारी, शिवणे (मावळ); सध्या निलंबित
10) अश्विनी व्यंकटराव गोरे – ग्राम महसूल अधिकारी, शिवली (मावळ)
11) सुजाता गोविंदराव रच्चेवार – ग्राम महसूल अधिकारी, कुरवंडे (मावळ); सध्या वराडे (मावळ)
12) श्रीकांत कुलकर्णी – तत्कालीन लिपिक, मावळ; सध्या महसूल सहायक, पुणे शहर
13) सुरेश सोपानराव जगताप – तत्कालीन मंडळ अधिकारी, खडकाळा; सध्या सहाय्यक महसूल अधिकारी, खनिकर्म शाखा, पुणे
14) ज्ञानेश्वर सुदाम भराटे – ग्राम महसूल अधिकारी, तळेगाव ढमढेरे; सध्या पाषाण (हवेली)
15) संजय पाटील – तत्कालीन तहसीलदार, दौंड; सध्या उपजिल्हाधिकारी (करमणूक कर), मुंबई शहर
दरम्यान, या प्रकरणात पुढील चौकशीत आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दोषी आढळणाऱ्या उर्वरित अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई होणार असल्याचे संकेत सुत्रांच्या माहिती नुसार मिळत आहेत.



