
लोणी काळभोर (ता. हवेली) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर येथील बौध्दवस्ती परिसरात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भीम सत्ता प्रतिष्ठान व सिद्धार्थ संघ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
जयंती उत्सवाची सुरुवात १३ एप्रिलच्या रात्री आकाशकंदील प्रज्वलित करून झाली. यावेळी रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून निघाला. जयभीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. १४ एप्रिल रोजी पारंपारिक ढोल-ताशे, लेझीम व विविध वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या रथातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मिरवणूक दणक्यात पार पाडली. निळे झेंडे, घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे मिरवणूक विशेष आकर्षण ठरली.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. बालक व युवकांनी नृत्य, गीत, भाषण आदी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे एपीआय बोराटे, कर्मचारी दरेकर, शेलार, कदम मॅडम, बारवकर मॅडम उपस्थित होते. उपसरपंच गणेश तात्याराम कांबळे त्यांच्या हस्ते पोलिसांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे मिरवणूक व सर्व कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडले.
या प्रसंगी लोणी काळभोरचे उपसरपंच गणेश तात्याराम कांबळे, सिद्धार्थ संघ तरुण मंडळाचे अध्यक्ष विनायक लक्ष्मण कांबळे, अॅड. नोटरी भारत सरकार प्रकाश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे, संजय कांबळे, विकास कांबळे, सचिन कांबळे, कैलास भालेराव, दीपक शेलार, अमित कांबळे, प्रतीक कांबळे, प्रवीण कांबळे, पंकज भालेराव, गौतम शेलार, गोविंद शेलार, राजू भोसले, धीरज वीरकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडला. बौध्दवस्ती परिसरात जयंतीनिमित्त एकोपा व बंधुभावाचे दर्शन घडले.
Editer sunil thorat



