
मांजरी बुद्रुक, पुणे : मांजरी बुद्रुक येथील मांजराईनगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आज 31 व्या दिवशीही कायम असून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट उसळली आहे.
या आंदोलनात अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनची कामे तात्काळ सुरू करणे, तसेच 116 व 72 घरकुल वसाहतींमधील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत नळ कनेक्शन देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही प्रभाग क्रमांक 15 मधील एकही लोकप्रतिनिधी, तसेच आमदार किंवा खासदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दखल घेतलेली नाही. एवढेच नव्हे तर या कामांसाठी कोणताही निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवण्यासाठी आज आंदोलनातील महिलांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. हातात दुर्बिणी घेऊन संबंधित लोकप्रतिनिधींचा शोध घेण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न महिलांनी केला. “इतक्या दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण आमच्या समस्या पाहायला एकही जबाबदार व्यक्ती येत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केली.
या प्रतीकात्मक आंदोलनानंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी संबंधित लोकप्रतिनिधीं विरोधात पोलीस ठाण्यात ‘हरवल्याची तक्रार’ दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
“जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून, प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Editer sunil thorat



