कदमवाकवस्ती येथे शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा कट ; पोलीस ठाण्यात धडक निवेदन, आरोपींवर तातडीने अटकेच्या कारवाईची मागणी…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : शिवसेना पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा कट रचल्याची गंभीर घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांना निवेदन सादर केले असून, संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, निलेश काळभोर हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. अशा कार्यकर्त्यावर हल्ला करण्याचा कट रचला जाणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तसेच समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही नमूद करण्यात आले.
सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत असून, त्याचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. फरार आरोपीमुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू शकते, अशी शक्यता व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा तपास जलदगतीने व निष्पक्षपणे करण्यात यावा, सर्व संबंधित आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या घटनांवर वेळीच लगाम लावणे गरजेचे असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या वेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, जिल्हा समन्वयक गणेश मस्के, शिवसेना नेते योगेश झुरुंगे, उपसरपंच दीपक लोणारी, शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख अभिषेक पवार, विभाग प्रमुख अनिल दशरथ शिंदे, पारस वाल्हेकर, कदमवाकवस्ती शहर प्रमुख सागर कुंदेकर, हेमंत कोळपे, प्रल्हाद शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवेदन पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांनी स्वीकारले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आली.
Editer sunil thorat



