पुणे–सोलापूर महामार्ग ठप्प : कोंडीने नागरिक हैराण ; वाहतूक शाखेच्या ढिसाळ कारभारावर संताप…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : शहराच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पुणे–सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दि.२१ रोजी सायकाळी पाहायला मिळाले. तब्बल १० ते ११ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने हजारो नागरिक तासन्तास अडकून पडले. मात्र या संपूर्ण प्रकारात वाहतूक शाखेचा हलगर्जीपणा आणि नियोजनशून्यता उघडपणे समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडे जाणार्या मार्गावर फुरसुंगी फाटा, टोल नाका, काळभोर लाँन्स, लोणी स्टेशन, एम आय टी काँर्नर, थेऊर फाटा ते कुजीरवाडी दरम्यान वाहतूक कोंडी दोन्ही बाजूने झाली असता. सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर फुरसुंगी फाटा (इंद्रप्रस्थ कार्यालय चौक) ते आकाशवाणी हडपसर दरम्यान तब्बल ६ किलोमीटर अंतरावर वाहने अक्षरशः ठप्प झाली होती. याशिवाय फुरसुंगी फाटा ते लोणी स्टेशन दरम्यान आणखी ४ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण महामार्गावर वाहनांच्या रागा व कर्कश होर्नचा आवाज येत होता.
या भीषण कोंडीत सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी यांचे प्रचंड हाल झालेच, पण सर्वात गंभीर बाब म्हणजे रुग्णवाहिका देखील या कोंडीत अडकून पडल्या. जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकांना मार्ग न मिळणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वाहतूक शाखेचा ‘मनमानी’ कारभार?
कोणाच्या हट्टासाठी लोणी काळभोर वाहतूक शाखा बद करण्यात आली हे न समजण्यासारखे कोडे आहे. स्थानिक नागरिकांनी या कोंडीसाठी थेट वाहतूक शाखेलाच जबाबदार धरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील वाहतूक शाखा बंद करून वाहतुक विभागाचा कारभार वैदवाडी येथील मुख्य कार्यालयात हलविण्यात आला. परिणामी फुरसुंगी फाटा, टोल नाका, स्टेशन चौक, एमआयटी चौक, थेऊर फाट्यावर व परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. अशा महत्त्वाच्या महामार्गावर पुरेसे मनुष्यबळ नसताना वाहतूक विभाग वाहतुकिवर कसे नियंत्रण कसे राखणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.
तसेच महामार्गालगत असलेल्या लग्न समारंभ कार्यालयांमुळे होणारी अनियंत्रित पार्किंग, विरुद्ध दिशेने धावणारी वाहने आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. मात्र हे सर्व सुरू असताना वाहतूक शाखा मात्र कुठेच प्रभावीपणे दिसली नाही, अशी टीका स्थानिकांनी केली.
घटना घडल्यावरच प्रशासनास जाग येते का?
दरवेळी मोठी कोंडी झाल्यानंतरच वाहतूक शाखा हलते, हा अनुभव नागरिकांनी नेहमीसारखा पुन्हा एकदा घेतला. नियमित नियोजन, पूर्वतयारी आणि संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याऐवजी ‘घटना घडल्यानंतर धावपळ’ हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे. या संदर्भात वाहतूक शाखा हडपसरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट यांनी सांगितले की, “फुरसुंगी फाटा परिसरात विरुद्ध दिशेने वाहने आल्यामुळे कोंडी झाली. आमची टीम तात्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत सुरू करणार आहे.”
मात्र नागरिकांना हा खुलासा अपुरा वाटत असून, “फक्त कारणे सांगण्यापेक्षा ठोस उपाययोजना करा,” अशी मागणी होत आहे. यासाठी नागरिकांची ठोस मागणी आहे की…
••• लोणी काळभोर येथील बंद वाहतूक कार्यालय तातडीने सुरू करावे
••• महामार्गावर कायमस्वरूपी वाहतूक कर्मचारी तैनात करावेत.
••• लग्न हॉल आणि व्यावसायिक आस्थापनांवर कठोर कारवाई करावी.
••• विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी.
••• वाहतूक कर्मचारी वाढवून उपाय योजना करावी.
पुणे–सोलापूर महामार्गावरील आजची कोंडी ही केवळ अपघाती घटना नसून वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तरी वाहतूक शाखा जागी होऊन ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणार का, हा प्रश्न नागरिकांच्या मनात कायम आहे.
Editer sunil thorat


