लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : खुनाच्या प्रयत्नातील तिघे २४ तासांत जेरबंद, हत्यारांसह अटक…

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी जलद आणि अचूक कारवाई करत खुनाच्या प्रयत्नातील तिन्ही आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून धारदार हत्यारे तसेच मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार दिनांक १८ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथक, चौकी अधिकारी व बीट मार्शल पथक गस्त घालत असताना टोल नाका परिसरात काही इसम धारदार हत्यारांसह फिरत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८), कुणाल राहुल चौगुले (वय १८) तसेच एक विधीसंघर्षित बालक (वय १७) यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून धारदार हत्यारे व मोपेड वाहन जप्त करण्यात आले.
चौकशीत आरोपींनी पुणे-सोलापूर रोडवरील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ गणेश नवनाथ कांबळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची कबुली दिली. जखमीवर उपचार सुरू असून मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १६७/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ व भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मांजरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. २४/२०२६ (कलम १०९, ११५(३), ३(५) इ.) देखील उघडकीस आणण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप, अंमलदार कर्डीले, पोलीस अंमलदार पुंडे, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, पोलीस हवालदार सागर जगदाळे तसेच बीट मार्शलचे पोलीस अंमलदार दिपक गायकवाड व निखिल मेमाणे, अशोक गिरी यांचा समावेश होता.
लोणी काळभोर पोलिसांच्या वेगवान आणि समन्वयित कारवाईमुळे गंभीर गुन्हा उघडकीस आला असून, आरोपींना वेळेत अटक करण्यात यश मिळाले आहे. यामुळे परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
Editer sunil thorat



