“शिवसेना शिंदे गटाच्या निलेश काळभोरवर हल्ल्याचा कट उधळला ; दोघे अटकेत”

लोणी काळभोर, (ता. हवेली) : “निलेश काळभोरचा आज गेम वाजवायचा” असा आरडाओरडा करत हॉटेलमध्ये पिस्तूल व धारदार शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्या चौघांपैकी दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक सुर्यकांत बापुसाहेब उंद्रे (वय ४०, रा. मांजरी खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रणवराज सुनिल यादव (वय २५, रा. मांजरी ग्रीन ॲनेक्स, मांजरी बुद्रुक) आणि जय गणेश शेलार (वय २५, रा. पवार रेसिडेन्सी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे.
रविवारी पहाटे दोनच्या सुमारास हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील “माईलस्टोन ०९” हॉटेलमध्ये चार जणांनी पिस्तूल व धारदार शस्त्रे हातात घेऊन जबरदस्तीने प्रवेश करत दहशत माजवली होती. “निलेश काळभोरचा गेम वाजवायचा होता” अशी धमकी देत त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस मांजरी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की आरोपी प्रणवराज यादव व जय शेलार हे धारदार शस्त्रांसह मांजरी ग्रीन ॲनेक्स परिसरात थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
Editer sunil thorat


