खाकी डागाळली! लाच घेऊन पोलिसांनीच आरोपीला पळवले ; ‘डिजिटल लाचे’चा धक्कादायक प्रकार उघड…

फोटो सौजन्य – सोशल मिडिया
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाची मान खाली घालणारी आणि ‘खाकी’ वर्दीची प्रतिमा डागाळणारी एक अत्यंत धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाच्या आवारातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी स्वतः पोलिसांनीच आपल्या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हवालदार एकनाथ तळपदे, प्रशांत राठोड आणि वसीम शेख यांचा समावेश आहे. आरोपीला फरार होण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात या तिघांनी तब्बल ४५ हजार रुपयांची लाच घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम रोख स्वरूपात न घेता डिजिटल पद्धतीने, गुगल पे (GPay) द्वारे ५-५ हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘डिजिटल लाचखोरी’चा हा प्रकार पाहून सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
तपासानुसार, न्यायालयातील पिंजरा गाडीजवळ आरोपी विनोद सोनी याला आणण्यात आले होते. त्यावेळी संबंधित पोलिसांनी त्याच्या हातातील बेड्या मुद्दाम सैल केल्या. त्यानंतर आरोपीने लघुशंकेचा बहाणा करत पळ काढला. या संपूर्ण कटात आरोपीची पत्नी साक्षी सोनी आणि मुलगा अतुल सोनी यांनीही मदत केल्याचा आरोप असून, त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेमुळे पोलीस दलात मोठा संताप व्यक्त होत आहे. कारण, क्राईम ब्रांच युनिट ३ च्या पथकाने तब्बल १६ वर्षांपूर्वीच्या गाजलेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला मध्यप्रदेशातून अटक केली होती. सलग सहा महिने तपास करून पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यानच काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी पैशांच्या हव्यासापोटी आरोपीला पळून जाण्याची संधी दिल्याने संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षांपूर्वी विनोद जयसवाल नावाच्या व्यक्तीची हातपाय बांधून आणि गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीर्घकाळ फरार होता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली होती. मात्र, अवघ्या ४५ हजार रुपयांसाठी काही पोलिसांनीच आरोपीला फरार होण्यास मदत केल्याने ‘रक्षकच भक्षक’ झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे
दरम्यान, न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध भागात रवाना करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Editer sunil thorat



