भारत : किया इंडियानं नवीन कॉम्पॅक्ट प्रीमियम एसयूव्ही सिरॉस अखेर लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या एसयूव्हीचा रुबाब काही औरच असून गाडीचं बुकिंग फेब्रुवारी २०२५ च्या सुरू होणार आहे.
किया इंडियानं या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, किया सिरॉस ही कार अद्ययावत सुविधांनी सुसज्ज आहे. यात एडीएएस लेव्हल २ तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या २० दर्जेदार सुविधा असून त्यामुळं ड्रायव्हिंग अत्यंत सुरक्षित होणार आहे. याशिवाय एसयूव्हीमध्ये हरमन कार्डन स्पीकर सिस्टम असून त्यामुळं एक वेगळाच अनुभव मिळणार आहे.
सिरॉसची किंमत किती?
‘आज सिरॉस जागतिक पातळीवर लाँच करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदाच समोर आली आहे. लोकांनी आधी ती कार पाहावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे आम्ही त्यांच्या अपेक्षित किंमतीचा विचार करू. या महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला किंमत जाहीर करण्याची आमची योजना आहे, अशी माहिती किया इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विक्री प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी एएनआयशी बोलताना दिली.
कॉम्पॅक्ट आणि मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये कियाचा सध्या १५ टक्के मार्केट शेअर आहे. सिरॉसच्या लाँचिंगसह येत्या काही महिन्यांत हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे, असंही ब्रार यांनी सांगितलं.
सिरॉसमध्ये दोन इंजिन पर्याय
किया सिरॉसमध्ये दोन इंजिनाचे पर्याय आहेत. त्यात स्मार्टस्ट्रीम १ लीटर टर्बो पेट्रोल ८८.३ किलोवॉट (१२० पीएस) आणि १७२ एनएम टॉर्क आणि १.५ लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन ८५ किलोवॉट (११६ पीएस) आणि २५० एनएम टॉर्कसह उपलब्ध आहे. दोन्ही इंजिनांमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. या एसयूव्हीमध्ये २५५० एमएमचा व्हीलबेस देण्यात आला आहे.
सिरॉस म्हणजे काय?
कियाच्या नव्या एसयूव्हीच्या नावाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. खरंतर ‘सिरॉस’ हे नाव निसर्गरम्य ग्रीक बेटापासून प्रेरित आहे. हे नाव कारचा अभिजात दर्जा आणि देखणेपणाचं प्रतीक आहे.
किया इंडियानं २०२४ मध्ये २०० नवीन टचपॉईंट्स जोडून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील ३०० शहरांमध्ये एकूण ७०० टच पाईंटपर्यत किया पोहोचली आहे. हा विस्तार कियाची उत्पादनं आणि सेवांमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा