तुळशीराम घुसाळकर / हवेली
पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथे इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून घरी बोलावले व तिच्याशी छेडछाड करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मांजरी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवस्ती परिसरात घडली आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून साहील मेहबुब शेख (वय १९, रा. मोरे वस्ती मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वीही शेख याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधायक कलम ३२६ व इतर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. सदर प्रकार हा फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीता ही आपल्या कुटुंबियांसोबत लोणी काळभोर परिसरात राहते. ती सध्या दुसऱ्या जिल्ह्यात बारावीचे शिक्षण घेत आहेत. तिच्या एका मैत्रिणीने साहील याच्याशी तिची इंन्स्टाग्रामवर ओळख करून दिली होती. त्यानंतर साहील याने ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिच्याशी मैत्री केली. एके दिवशी तिला घरी भेटण्यासाठी बोलाविले. तेव्हा त्याच्या घरी कोणीही नव्हते. त्यावेळी त्याने लग्न करणार असल्याचे सांगत लगट करून विनयभंग केला. मुलीने घरी आल्यानंतर याबाबत आई-वडिलांना सांगितले. तेव्हा तिच्या घरातील लोकांनी या लग्नाला विरोध केला. व त्यानंतर पिडीतेने त्याच्याशी बोलण्यास व भेटण्यास नकार दिला.
आपल्याला भेटण्यास टाळाटाळ करीत असल्याचा राग मनात धरून साहिलेने पिडीतेशी गेल्या दोन दिवसांपूर्वी (१७ जानेवारी) रोजी मोबाईल वरून संपर्क साधला व “तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही, तर मी आता पंख्याला फाशी घेईल. तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल. माझ्याकडे आपले व्हिडीओ आहेत, ते मी व्हायरल करेल” अशी धमकी दिली. पिडीतेने आई सोबत तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. व साहिल याच्याविरुद्ध तक्रार दिली.
त्यानुसार त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा