नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान; UPSC यशस्वी हेमंत कड यांचा सोसायटीत भव्य गौरव…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : सिद्धिविनायक पार्क, स्टार सिटी (कवडी माळवाडी) येथे सामाजिक ऐक्य, शैक्षणिक प्रेरणा आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान अशा त्रिवेणी संगमाने एक प्रेरणादायी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. Union Public Service Commission (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत डायरेक्ट आर्मी लेफ्टनंट (DYSP समकक्ष) पदासाठी ऑल इंडिया गुणवत्तायादीत पहिल्या ४६ मध्ये स्थान मिळवणाऱ्या हेमंत प्रवीण कड यांचा सोसायटीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. याचबरोबर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या शितलताई सुजित कांबळे आणि पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
हेमंत कड यांचे यश ठरले प्रेरणादायी…
हेमंत कड यांनी अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे कदमवाकवस्ती परिसरासह संपूर्ण हवेली तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते सिद्धिविनायक पार्क, स्टार सिटी येथील ज्येष्ठ सभासद व आदर्श शिक्षक अशोक कड यांचे पुतणे तसेच राजश्री प्रवीण कड यांचे चिरंजीव आहेत. कुटुंबातील शैक्षणिक संस्कार, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले. यावेळी कड दांपत्याचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सोसायटीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. अनेक युवक-युवतींनी त्यांच्या यशाबद्दल उत्सुकता व्यक्त करत मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.
संवाद साधताना हेमंत कड म्हणाले, “स्टार सिटी ही केवळ माझी सोसायटी नसून माझे कुटुंबच आहे. येथे झालेल्या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. भविष्यात येथील विद्यार्थ्यांसाठी UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करून योग्य दिशा देण्याचा माझा मानस आहे. योग्य नियोजन, सातत्य आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठता येते.”
लोकप्रतिनिधींचाही सन्मान…
कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या शितलताई सुजित कांबळे आणि पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे यांचाही सत्कार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचा कौल मिळवत निवडून आल्याबद्दल सोसायटीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत विकासकामांना गती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
पाणीटंचाईबाबत महिलांचे निवेदन…
कार्यक्रमादरम्यान सोसायटीतील महिलांनी परिसरातील पाणीटंचाईचा मुद्दा मांडत लेखी निवेदन सादर केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती पाणी समस्या, अपुरी पुरवठा व्यवस्था आणि टँकरवर अवलंबित्व या अडचणींबाबत त्यांनी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले.
जिल्हा परिषद सदस्या शितलताई कांबळे यांनी निवेदन स्वीकारून महिलांना पाण्याचे महत्त्व अधिक जाणतेपणाने समजते, असे सांगितले. संबंधित विभागाशी समन्वय साधून लवकरच या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पाहणी करून उपाययोजना राबवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान …
या सन्मान सोहळ्याला Adv. राहुल झेंडे, स्टार सिटी सिद्धिविनायक पार्कचे अध्यक्ष सखाराम घाडगे, आधारस्तंभ सुशील महाराज काळभोर, श्रीनिवास वाघ, मोहन तात्या काळभोर, दिगंबर जोगदंड तसेच सोसायटीचे सर्व सभासद व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम सुशील महाराज काळभोर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी प्रभावी शब्दांत केले. उपस्थितांनी हेमंत कड यांच्या जिद्दीचे कौतुक करत परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने वळावे, असा संदेश दिला.
सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण...
या सन्मान सोहळ्यामुळे सिद्धिविनायक पार्क, स्टार सिटी परिसरात एक सकारात्मक, एकोप्याचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. शैक्षणिक यश आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम परिसरासाठी आदर्श ठरला असून, युवकांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी परिश्रम करावेत, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
Editer sunil thorat




