लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात कडक कारवाई ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे.
अवैध धंदे, मटका, जुगार समूळ नष्ट करण्यासाठी सक्त कारवाई

पुणे (हवेली) : बेट परिसरातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी सोमवार (२७ जानेवारी) रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात साडेचार हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांच्या या सततच्या कारवायांमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी कारवाईचा धूमधडाका सुरू केला आहे. गेले १२ दिवसाच्या कालावधीत आत मटका, जुगार व हातभट्टींच्या धंद्यांवर छापे टाकून कारवाईचा बडगा उगारला आहे. तर एका टोळीवर मोका तर एमपीडीए गुन्ह्यातील एका फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी पोलिस अंमलदार बाजीराव चंदर वीर यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांवरून माऊली उर्फ ज्ञानेश्वर निवृती राखपसरे (वय ४०, रा. बेटवस्ती, थेऊरफाटा, लोणी काळभोर, ता.हवेली, जि. पुणे), किशन शाहु टिंगरे (वय ३९, रा.सरकारी दवाखान्याजवळ, धर्मराजनगर, मांजरी बुद्रुक, पुणे) व बालाजी धर्मराज माने (वय ३३, रा. दिल्लीवाला गोठ्या शेजारी, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि.पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस, पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. पथकातील पोलिस अंमलदार बाजीराव वीर यांना बेट परिसरात बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरू आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
तेव्हा वरील तिन्ही आरोपी हे बेकायदेशीरपणे ५२ पानी पत्त्यांचा रमी हा जुगार पैशांवर खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी या छाप्यात रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिन्ही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यांतील माऊली उर्फ ज्ञानेश्वर निवृती राखपसरे याच्यावर यापुर्वीही या प्रकाराचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस अंमलदार योगेश पाटील, बाजीराव वीर, शैलेश कुदळे व राहुल कर्डिले यांच्या पथकाने केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे.
राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)
अवैध धंद्यावरील कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आहे आहे.



