सिलिंडर गॅसची काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्याचा रॅकेटचा लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ च्या पथकाने केला पर्दापाश…..

पुणे (हवेली) : अवैधरित्या व धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरमधून नोझलच्या सहाय्याने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन त्याची काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्याचा रॅकेटचा लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ च्या पथकाने पर्दापाश केला आहे.
याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिराच्या परिसरातील एका गोडाऊनमध्ये बुधवार (१२ मार्च) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सदर प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी मदन माधव बामने (वय-२०, रा. महादेव मंदीराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस अंमलदार शेखर काटे यांना लोणी काळभोर येथील महादेव मंदीराजवळ असलेल्या साईसृष्टी बिल्डींग पाठीमागील एका गोठ्यामध्ये एक जण घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून बेकायदा विक्री करीत आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६ व लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा मदन बामने हा अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ३१ हजार ९०० रुपये किंमतीच्या ११ व्यावसायिक वापराच्या टाक्या, इंडेन कंपनीच्या १७ हजार १५० रुपये किंमतीच्या ७ घरगुती गॅस टाक्या, पुष्पा कंपनीच्या १३ हजार रुपये किमतीच्या ९ घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ५१ हजार ४५० रुपये किंमतीच्या २१ घरगुती गॅस वापराच्या टाक्या, हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीच्या १९ हजार ४५० रुपये किंमतीच्या असलेल्या २१ घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, रिलायन्स कंपनीच्या १४ हजार ७०० रुपये किंमतीच्या ६ घरगुती वापराच्या गॅस टाक्या, हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ३ हजार ५०० रुपये किंमतीच्या २ लहान गॅस टाक्या, स्थानिक कंपनीच्या ८६ हजार रुपये किंमतीच्या एकून ८६ लहान-मोठ्या गॅस टाक्या, ५०० रुपये किंमतीचे एकूण ५ नग गॅस ट्रान्सफर करण्याचे लोखंडी नोझल, २०० रुपयांचे एक पितळी नोझल, २ हजार रुपये किंमतीचे रेग्युलेटर पाईप व साडेतीन हजारांचा एक इलेक्ट्रीक वजनकाटा असा सुमारे २ लाख २४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, अनधिकृत भरलेले गॅस सिलेंडर हे लोणी काळभोर येथील त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हीस या दुकानात ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा कलमान्वये व जिवनावश्यक वस्तु कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई गुन्हे शाखा युनीट चे ६ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार रामहरी वणवे, कानिफनाथ कारखेले, प्रदीप क्षीरसागर, पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन मुंडे,अक्षय कटके, सचिन सोनवणे, प्रतीक्षा पानसरे, बालाजी बांगर व हवेलीचे पुरवठा निरीक्षक इम्रान मुलाणी यांच्या पथकाने केली आहे.



