जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

पुणे : जल जीवन मोहिमेअंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालावधीत पूर्ण करून त्या भौतिकदृष्ट्या कार्यान्वित करण्याचे निर्देश जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल’ योजनेद्वारे प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर शासनाचा भर आहे. ज्या योजनांमध्ये एफएचटीसी (Functional Household Tap Connection) प्रलंबित आहेत, त्यांना प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
ज्या ठिकाणी नळ जोडण्या अद्याप अपूर्ण आहेत, त्या कामांना गती देऊन निर्धारित वेळेत पूर्ण करावे. योजनांची अंमलबजावणी करताना उद्भवणारे जमीन विषयक प्रश्न, भू-संपादन, परवानग्या तसेच तांत्रिक अडचणी समन्वयातून तात्काळ सोडवाव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले.
सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून जल जीवन मोहिमेची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी केले.
Editer sunil thorat



