४ वर्षांपासून फरार घरफोडी आरोपी अखेर जेरबंद ; गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई!

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर : तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकवणाऱ्या घरफोडी आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक केली आहे.
अटक झालेला आरोपी म्हणजे दिपक नामदेव घारोळे (वय २४, रा. गल्ली क्र. ३, बिराजदार नगर, हडपसर, पुणे) होय.
सन २०२१ साली लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिपक घारोळे याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो वेशांतर करून पोलिसांच्या नजरेतून गायब झाला होता. गेल्या चार वर्षांपासून तो सतत ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन करत असताना, खबऱ्याकडून माहिती मिळाली की फरार आरोपी घारोळे हा बिराजदार नगरजवळील कालव्यालगत थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला आणि मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, काटे, लांडे, धाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
Editer sunil thorat



