
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात ‘जॅपनीज एन्सेफेलायटिस’ (जपानी मेंदूज्वर- जेई) ची प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून १ ते १५ मार्च दरम्यान १ लाख २३ हजार ४२७ हजार (१ ते १५ वर्षे वयोगट) मुला- मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
ही लस सुरक्षित असून पालकांनी मुलांना द्यावी असे आवाहन सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी केले आहे.
‘जेई’ लसीकरण मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये राबवली जात आहे. शहरातील सर्व मुला-मुलींचे शालेय व समाजस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. लस पूर्ण प्रशिक्षित वैद्यकीय पथकांमार्फत देण्यात येत असून लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणतेही दुष्परिणाम सहसा आढळून येत नाहीत. त्यामुळे १ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थींनी ही लस घ्यावी, असे आवाहन मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी केले आहे.
पुणे शहर कार्यक्षेत्रामधील सर्व अंगणवाडी व शाळांनी ‘जेई’ लसीकरण मोहीम राबविण्यासाठी नजीकच्या आरोग्यकेंद्रात अथवा क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनीकेले आहे.
काय आहे ‘जेई’?
‘जेई’ एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग क्युलेक्स डासांच्या चाव्याने होतो. हा डास पाणथळ व गवताळ प्रदेशाच्या भागातील डासांमध्ये दिसून येतो. तसेच त्याचे वाहक हे डुकरे देखील आहेत. याची बाधा लहान मुलांना होण्याची शक्यता जास्त असते व त्यामुळे मेंदूच्या आवरणाला सूज येऊन वेळेवर उपचार न झाल्यास बालक दगावू शकते.



