अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा…
परिमंडळ ५ : कोंढवा पोलीस ठाण्याची कारवाई...

पुणे : परिमंडळ ५ अंतर्गत कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना १७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता मोहम्मदवाडी येथील कृष्णानगरजवळील अंडर कन्स्ट्रक्शन रुममध्ये घडली होती. आरोपी अनिस नैस मोहम्मद (वय ३६) याने खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७६७/२०१९ भादंवि कलम ३७६, ३७६(३), ३७६(एबी) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ चे कलम ४, ६, ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील (सध्या विशेष शाखा, पुणे शहर) यांनी केला. तपासानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
शिवाजीनगर येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश (POCSO) यांनी आरोपी अनिस नैस मोहम्मद यास १० ऑक्टोबर २०२५ रोजी २० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, तर दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील नितीन कोंघे, तसेच कोर्ट पैरवीसाठी महेश जगताप, विजय माने आणि अंकुश बनसोडे यांनी कामकाज पाहिले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी तपासी अधिकारी सपोनि स्वराज पाटील, तसेच कोर्ट पैरवी टीमला प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Editer sunil thorat



