
लोणी काळभोर (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर व पिर देवाच्या वार्षिक यात्रेत गर्दीचा फायदा घेत दोन अज्ञात महिलांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती विठ्ठल गोठे (वय २४, रा. माळवाडी, कुंजीरवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्या आपल्या कुटुंबीयांसह सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. सुमारे सात वाजता दर्शन आटोपून गर्दीतून बाहेर पडत असताना अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या दोन अनोळखी महिलांनी जाणीवपूर्वक धक्काबुक्की केल्याचे त्यांना जाणवले.
गर्दीतून बाहेर आल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाचे, अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीस गेल्याचे लक्षात आले. तसेच त्यांच्या कडेवर असलेल्या एक वर्षाच्या कृष्णा या मुलाच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किमतीचा दीड ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदामही लंपास करण्यात आला.
घटनेनंतर परिसरात शोधाशोध केली असता गावातील इतर महिलांनाही याच प्रकारे लुटण्यात आल्याचे समोर आले. यामध्ये सुजाता सतीश गाढवे यांचे डोरले, आशा संतोष कांबळे यांचे पॅन्डल, प्रियांका जगधने यांच्या मुलाचे सोन्याचे बदाम, अनिता सुनील शिंदे यांच्या नातवाचे कानातील बाळी व बदाम, तसेच शोभा युवराज चव्हाण यांच्या नातवाचे गळ्यातील बदाम यांसह आणखी तीन ते चार महिलांचे दागिने चोरीस गेल्याची माहिती आहे.
या सर्व दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व संशयितांचा शोध सुरू आहे. यात्रांमध्ये नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Editer sunil thorat



